मुंबई विद्यापीठात एईडीपी (AEDP) पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात

0
9

शिक्षणासह थेट उद्योगातील प्रशिक्षणाची संधी होणार उपलब्ध

मुंबई, दि.०८ मेः पदवीचे शिक्षण घेतानाच थेट उद्योगातील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून, मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून २० पदवी स्तरावरील शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रमांची (Apprenticeship Embedded Degree Programme – AEDP) सुरूवात केली आहे. हे पदवीचे सर्व २० अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत या शैक्षणिक वर्षापासून सुरु केले जात आहेत. या अभ्यासक्रमांत बी.एस्सी. (पेंट टेक्नॉलॉजी), बीएमएस (कस्टम्स क्लिअरन्स, फ्रेट फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक्स), बीएमएस (ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट), बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाइन, बी.एस्सी. (फिटनेस), बी.एस्सी. (एआय अँड एमएल), बी.एस्सी. (एरोनॉटिक्स), बी.एस्सी. (बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स), बी.ए. (ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशन अँड डिझाइन), बीएमएस (कॅपिटल मार्केट्स), बीएमएस (इव्हेंट मॅनेजमेंट अँड पब्लिक रिलेशन्स) यासह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सर्व अभ्यासक्रम नामांकित उद्योग भागीदार आणि व्यावसायिक संस्थांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांसाठी लागू असणार आहेत.

पदवी स्तरावरील शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी अभ्यासक्रम या योजनेअंतर्गत, तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना किमान एक सत्र (२० क्रेडिट्स) आणि चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी दोन सत्रे (४० क्रेडिट्स) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. या दरम्यान विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या श्रेयांक आराखड्यानुसार (क्रेडिट फ्रेमवर्क) शैक्षणिक क्रेडिट्स मिळतील. मुंबई विद्यापीठाने या शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या बीओएटी-डब्ल्यूझेड (BOAT-WZ) सोबत आधीच सहकार्य करार केला आहे. तर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उद्योग समुहांशी करार केले आहेत.

कोटः

“शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी अभ्यासक्रम (एईडीपी) (Apprenticeship Embedded Degree Programme – AEDP) हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतातील उच्च शिक्षणात परिवर्तन घडवणारे एक महत्त्वाचे उपक्रम असून त्या दिशेने मुंबई विद्यापीठाने हे पाऊल टाकले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाचा अनुभव मिळणार असून विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वृद्धी करण्याचे ध्येय गाठता येणार आहे. या अनुषंगाने उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांसह, क्षेत्रीय कौशल्य परिषदा (Sector Skill Councils), आणि शासकीय विभागांसह भागीदारीतून दर्जेदार अ‍ॅप्रेंटिसशिप संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही एक भविष्यवेधी सुरुवात असून कुशल आणि रोजगारक्षम युवा पिढी घडविण्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ