
तिरोडा,दि.२६ः-तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंदीपूर येथे दिनांक 23 जून रोजी शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. या विशेष दिवशी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या 11 विद्यार्थ्यांचे व इतर शाळांतून आलेल्या 4 विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या आनंदात व उत्साहाने करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, चॉकलेट, आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेंदीपुरचे सरपंच धर्मदास चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिंद्र पटले, पोलीस पाटील चौधरीताई, ग्रामपंचायत सदस्य वाढवे ताई, अंगणवाडी सेविका
चौधरी ताई तसेच अनेक माता-पिता पालक यावेळी उपस्थित होते.
शाळेतील विशेष उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते त्यांच्या पालकांना भेट देण्यात आले. हा एक भावनिक व संस्मरणीय क्षण ठरला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना पोषण आहार अंतर्गत भात, मिक्स व्हेज, कढी,बुंदी व सेव यांचे भोजन देण्यात आले.
यावर्षी शाळेची पटसंख्या वाढल्याबद्दल समाधान वाटत असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.जितेंद्र डहाटे मुख्याध्यापक जि.प.शाळा मेंदीपुर.