
गोरेगाव,दि.29 : सहा महिन्यांपासून शाळेला शिक्षक मिळत नसल्याच्या कारणाने मोहगाव तिल्ली येथील संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी येथील जि.प. शाळेला कुलूप ठोकले. तर विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडून आपला निषेध नोंदविला.मोहगाव-तिल्ली येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत एक ते सातपयंर्त वर्ग आहेत. या शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. मागील सहा महिन्यांपासून पद रिक्त असताना प्रभारी मुख्याध्यापक एच.के.धपाडे यांची बदली करण्यात आली. प्रभारी मुख्याध्यापकाच्या बदली प्रकरणाने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांना बसवून शाळा उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. आधी रिक्त पदे भरा नंतरच शिक्षकांची बदली करा अशी मागणी लावून धरली..