
मुंबई, दि.०3 जुलै– मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे ०२ जुलै विद्यानगरी येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी ते ५४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी झूंज देत होते. प्रकृती अत्यावस्थामुळे सुरुवातीला त्यांची नानावटी रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. तपासाअंती त्यांना स्वादूपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान होताच त्यांना टाटा मेमोरिअल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अंतिम टप्प्यातील कर्करोगामुळे गुरूवार सायंकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. शुक्रवार सकाळी १०.३० वाजता सांताकृझ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. अजय देशमुख यांनी २४ जानेवारी, २०१९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला होता. तत्पूर्वी ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते संचालक महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ या पदावर कार्यरत होते. डॉ. अजय देशमुख यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजी या विषयात केले असून इंग्रजी साहित्यात त्यांनी विपूल संशोधन केले. इंग्रजी साहित्यातील संशोधक म्हणून त्यांनी अनेकांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले.
“अतिशय कुशल प्रशासक म्हणून डॉ. अजय देशमुख यांची ख्याती होती. अल्पावधीतच विद्यापीठाच्या प्रशासनिक आलेखात त्यांचे अमुल्य योगदान लाभले असून, अनेक महत्वपूर्ण निर्णयांची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली. विद्यापीठ, महाविद्यालयांचे अनेक प्रश्न त्यांनी अल्पावधीत निकाली लावले. त्यांच्या अकाली निधनामुळे विद्यापीठाचे अपरिमित नुकसान झाले असून त्यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन, त्यांच्या कुटुंबियांस या दुखातून सावरण्याची हिंमत लाभो. – प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ”
“प्रा. डॉ. अजय देशमुख हे अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व होते. विद्यापीठ प्रशासकिय बाबींचा सखोल अभ्यास, संभाषण कौशल्य, प्रशासनिक कौशल्यांच्या जोरावर अल्पावधीतच प्रशासनात गतिमानता आणली होती. ते माझे एक व्यक्तिगत मित्र होते, त्यांच्या अकाली जाण्यामुळे विद्यापीठाचे अपरिमित नुकसान झाले असून त्यांच्या पवित्र आत्म्यास सदगती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची हिंमत मिळो.”- प्रा. रविंद्र कुलकर्णी -प्र- कुलगुरू, मुंबई विद्यापीठ