आयटीआय व तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना उद्योगांसाठी प्रोत्साहित करा – अनिल पाटील

0
16
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा

         गोंदिया,दि.27 : मुख्यमंत्री निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व शासकीय तंत्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करावे. तसेच जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागाशी समन्वय साधून बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जागृती मेळाव्याचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिल्या.

        मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यास दिलेले उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजाकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एच.के.बदर, मिटकॉनचे सहायक विभागीय व्यवस्थापक विजय सेलोकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ए.एम.मोहोड, एससीईडीचे प्रकल्प अधिकारी संदिप जाने, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे व अजिक्य रामटेके उपस्थित होते.

        सदर योजना ही उत्पादन व सेवाक्षेत्रासाठी असून प्रकल्प मर्यादा सेवा क्षेत्राकरीता 10 लक्ष तर उत्पादन क्षेत्रासाठी 50 लक्ष रुपये आहे. शासनातर्फे मार्जिन मनी ही प्रकल्प किमतीच्या 15 ते 35 टक्के शहरी/ग्रामीण व खुला/मागासवर्गीय प्रवर्गानुसार देण्यात येते. शैक्षणिक पात्रता 25 लक्ष प्रकल्पाकरीता किमान 7 वा वर्ग तर 50 लक्ष प्रकल्पाकरीता किमान 10 वा वर्ग आहे. योजनेकरीता वयोमर्यादा खुला व मागासवर्गीय प्रवर्गाकरीता अनुक्रमे 45 व 50 वर्ष आहे. महिलांकरीता 50 वर्ष आहे. योजनेकरीता अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.maha-cmegp.gov.in या पोर्टलवर करावयाचे आहे. अशी माहिती एच.के.बदर यांनी दिली.

        विजय सेलोकर, संदिप जाने, श्रुती डोंगरे व अजिक्य रामटेके यांनी त्यांच्या संस्थेद्वारे प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहित करुन सदर योजनेद्वारे स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात येईल असे सांगितले.