200 महिलांना मिळणार निवासी नि:शुल्क प्रशिक्षण,युवती व महिलांनी अर्ज करावे

0
8

वाशिम, दि. 05 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हाधिकारी अमरावती व नव गुरुकुल फाऊंडेशन फॉर सोशल वेलफेअर यांच्या संयुक्तवतीने अमरावती विभागातील 200 सुशिक्षीत बेरोजगार युवती/ महिलांकरीता रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण व त्यानंतर निश्चित स्वरुपाच्या रोजगाराच्या संधी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आकांक्षा या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर प्रोग्रामींग या कोर्सचे प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणा दरम्यान संभाषण कौशल्य/ व्यक्तीमत्व विकासावर भर देण्यात येणार आहे. प्रशिक्षीत व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नामांकित कंपनी/स्टार्टअपमध्ये रोजगाराची संधी सुध्दा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण महिलांकरीता पुर्णपणे निशुल्क असून निवासी स्वरुपाचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी हा 18 महिन्याचा आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा पध्दती ही ऑनलाईन व ऑफलाईन आहे. यामध्ये चाळणी परीक्षा, इंग्रजी प्रविणता चाचणी, सामान्य गणीत चाचणी व पालकांसोबत मुलाखत अशी आहे. ऑनलाईन परीक्षा 10 ते 23 जुलै 2022 आणि ऑफलाईन परीक्षा 24 जुलै 2022 रोजी आहे.

प्रशिक्षणाचे वैशिष्ट म्हणजे प्रशिक्षण कालावधी 18 महिन्यांचा नि:शुल्क स्वरुपाचा असून यामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये लॅपटॉप देण्यात येईल. प्रशिक्षण प्रशिक्षीत तज्ञ मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. संभाषण कौशल्य व व्यक्तीमत्व विकासावर भर राहील. प्रशिक्षण व मुल्यमापनानंतर नामांकित कंपनी/स्टार्टअपमध्ये रोजगाराची हमी राहील. प्रवेश पात्रता ही 17 ते 28 वयोगटातील युवती व महिलांसाठी असेल. शैक्षणिक पात्रता 12 वी पास किंवा आयटीआय पुर्ण असावी. अमरावती विभागातील पाचही जिल्हयापैकी एका जिल्हयाची ती व्यक्ती रहिवासी असावी. पालक शासकीय क्षेत्रामध्ये नौकरीत नसावे. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील महिलांना प्रशिक्षणासाठी प्राधान्य राहील. अधिक माहितीसाठी 9096855798 किंवा 07252-231494 यावर संपर्क साधावा. परीक्षा नोंदणी 5 जुलैपासून सुरु झालेली आहे. http://bitly.ws/sAa8 या लिंकवर अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी www.navgurukul.org या संकेतस्थळाला भेट दयावी.

जिल्हयातील जास्तीत जास्त रहिवासी असलेल्या युवती/महिला उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दिलेल्या दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

*******