आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण

0
16

वाशिम, दि. 23-: आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर, कॅम्प, परतवाडा. जि. अमरावती येथे शासनाच्या वतीने विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेकरीता आदिवासी उमेदवारांची विनामुल्य प्रशिक्षणाव्दारे तयारी करुन घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी हा साडेतीन महिन्यांचा आहे. या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा १ हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो. या प्रशिक्षणाकरीता उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. १ डिसेंबर २०२२ रोजी किमान १८ वर्षे पूर्ण परंतु १५ मार्च २०२३ रोजी त्याने ३० वर्ष पूर्ण केलेले नसावे. तसेच त्याने किमान एस.एस.सी. परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी व तो सद्या कोणतेही शिक्षण अथवा प्रशिक्षण घेत नसावा.

          वरील पात्रतेच्या इच्छुक उमेदवारांनी १ डिसेंबर २०२२ पासून सुरु होणाऱ्या सत्रासाठी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत, आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लालपुल जवळ, अचलपुर, कॅम्प, परतवाडा. ता. अचलपुर. जि. अमरावती दूरध्वनी क्रमांक ०७२२३-२२१२०५/७७०९४३२०२४ येथे संपर्क साधावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्णची गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड http://rojgar.mahaswayam.in,  प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास कार्यालयात नांव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड, इत्यादी प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती व एक स्वतः चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. यापुर्वी सदर प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी यासाठी पुन्हा अर्ज करु नये. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अचलपुर येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.