नोकरी इच्छूक उमेदवारांकरीता २४ ते २९ डिसेंबर दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

0
13

 वाशिम, दि. 23 : जिल्हयातील नोकरी/ रोजगार इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,वाशिम या कार्यालयाने २४ ते २९ डिसेंबर २०२२ या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात टेक्नोक्राप्ट फॅशन लिमीटेड अमरावती, मॅट्रिक्स कॅड अकादमी मुंबई, एलआयसी ऑफ इंडिया शाखा वाशिम व स्पॉटलाईट सल्लागार इत्यादी नामांकित कंपनी/ उद्योगाकडील उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी नोकरी/रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे. यासाठी इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, आय.टी.आय. (इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान) व इंजिनिअरींग डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ या वयोगटातील युवक-युवती उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या पदनामाकरीता १०० पेक्षा जास्त रिक्तपदावर रोजगार मिळविण्याची संधी जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांना प्राप्त होणार आहे.

           जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांना www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्याकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधून मेळाव्यात सहभागी होता येईल. या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी आपणाकडे एम्पलॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजूकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअरवर क्लीक करावे. या ठिकाणी वाशिम जिल्हा निवडून त्यातील WASHIM JOB FAIR- 2 मध्ये नमुद पात्रतेनुसार पदावर अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल.या पध्दतीने या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येईल.

           काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम दूरध्वनी क्रमांक ०७२५२-२३१४९४ यावर संपर्क साधावा.असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.