
गोंदिया, दि.17 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हा उद्योग विभाग महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. ही योजना बेरोजगार युवक-युवतींना उद्योजक बनविण्यास सक्षम करणारी आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना आहे. सन 2022-23 मध्ये या योजनेत 732 अर्ज बँकांकडे सादर करण्यात आले. त्यापैकी 128 कर्ज प्रकरणांना बँकांनी मंजूर केले. सन 2023-24 करीता गोंदिया जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्रास 410 व खादी ग्रामोद्योग मंडळास 220 असे एकूण 630 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट या योजनेत देण्यात आलेले आहेत.
सदर योजना ही उत्पादन व सेवा क्षेत्रासाठी असून प्रकल्प मर्यादा उत्पादन क्षेत्रासाठी 50 लक्ष रुपये तर सेवा क्षेत्रासाठी 20 लक्ष रुपये आहे. शासनातर्फे या प्रकल्प किंमतीच्या मर्यादेत 15 ते 35 टक्के मार्जिन मनी शहरी/ग्रामीण व खुल्या/मागास प्रवर्गानुसार देण्यात येते. 10 लक्ष रुपये पर्यंतच्या प्रकल्प किमतीकरीता शैक्षणिक पात्रता किमान 7 वा वर्ग, 25 लक्ष रुपयाच्या किमतीकरीता किमान 10 वा वर्ग आहे. वयोमर्यादा किमान 10 व कमाल 45 वर्ष आहे. महिला, मागास, अपंग, माजी सैनिक यांना 5 वर्ष शिथिलक्षम आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.maha-cmegp.gov.in या पोर्टलवर करावयाचा आहे. प्रोजेक्ट रिपोर्ट नमुना पोर्टलच्या मेन्यूमध्ये देण्यात आलेला आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत, तिसरा माळा, खोली क्र.38, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे संपर्क साधावा. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गोंदिया यांनी कळविले आहे.