डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न 

0
11
 वाशिम,दि.२६-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,वाशिम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.वाशिम व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्व अंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय प्राचार्य किशोर वाहाणे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिमचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत,गुणवंत,मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह,वाशिमचे गृहपाल शेषराव इंगोले,मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वाशिमच्या गृहपाल श्रीमती वर्षा लाकडे, व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे विधी अधिकारी किरण राऊत उपस्थित होते.
      मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी दीप प्रज्वलन केले व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका समन्वयक संतोष बोरीवार यांनी 1 जानेवारी 2017 पासून सुरु झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत माहिती दिली.या योजनेमुळे अनुसूचित जातीमधील मुला-मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत होत असल्याने विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करता येणे सोईचे झाल्याचे सांगितले.
          या योजनेच्या अटी व शर्ती याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करतांना येणाऱ्या विविध अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यशाळेमध्ये या योजनेबाबत आपल्या शंका विचारुन शंकेचे निरसन केले.
           कार्यशाळेमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
         प्राचार्य डॉ.वाहाणे यांनी डॉ.बाबासाहेबांनी आपल्या विद्यार्थी दशेमध्ये असतांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधून अतिशय प्रतिकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे सर्वांनी आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठले पाहिजे असे सांगितले व योजनेचा उद्देशच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे हा असल्याने शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा व आपली प्रगती साधावी.असे ते म्हणाले.
               संचालन श्री.राऊत यांनी केले,आभार प्रदिप गवळी यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, पालक तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.