वाशिम, दि.२१ फेब्रुवारी – जनगणना २०२७ चे कामकाज सुरळीत व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार आहे.टेक्नीकल असिस्टंट १४ पदासाठी तसेच मल्टी टास्किंग स्टाफ या १ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.ही नियुक्ती १८ महिन्यांच्या कालावधीसाठी तहसील कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथील राजस्व सभागृहात वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टेक्नीकल असिस्टंट पदासाठी एकूण १४ पदे उपलब्ध असून मासिक मानधन २५ हजार रुपये इतके राहणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर, इंग्रजी व मराठी टायपिंगचे आवश्यक वेग, एमएस-सीआयटी उत्तीर्ण व किमान एक वर्षाचा शासकीय/निमशासकीय कार्यालयातील डेटा एन्ट्रीचा अनुभव असणे आवश्यक आहे. डिजिटल अॅप्लिकेशन हाताळण्याची क्षमता, उच्च शिक्षण व संगणक विषयक अतिरिक्त पात्रता असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी १ पद उपलब्ध असून मासिक मानधन १८ हजार राहील. या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, उच्च शिक्षण व संबंधित अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना मूळ कागदपत्रे, त्याच्या छायांकित प्रती व पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. दुपारी १ नंतर येणाऱ्या उमेदवारांचा तसेच ई-मेल किंवा पोस्टाद्वारे प्राप्त अर्जांचा विचार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.




