वाशिम, दि. ०7 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रिसोड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व रिसोड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, १७ मार्च २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वा. दरम्यान रिसोड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे हा मेळावा होणार आहे. तरी सुशिक्षित बेरोजगार तसेच नोकरी इच्छुक युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.
बारामती येथील पियाजीयो व्हेइकल्स प्रा. लि., पुणे येथील एस.आय.एस. इंडिया, नागपूर येथील सेफज्युकेट लर्निंग प्रा. लि., जळगाव येथील नवकिसान बायो प्लॅनटेक लि., अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील टेक्नोलॉजी इंडस्ट्रीज इंडिया लि., वाळूज-औरंगाबाद येथील व्हेरॉक इंजिनीअरिंग प्रा. लि., वाशिम येथील सेक्युरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन इत्यादी नामांकित उद्योग, कंपनी रोजगार मेळाव्यामध्ये मुलाखतीद्वारे बेरोजगार उमेदवारांना खाजगी नोकरीची संधी देण्यासाठी सहभागी होत आहेत.
इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण (सर्व शाखा), आय. टी. आय. (सर्व ट्रेड), पदवीधर (कला, वाणिज्य, विज्ञान), अभियांत्रिकी पदवीधर, इंजिनिअरींग डिप्लोमा (सर्व शाखा), ए. एन.एम., जी. एन.एम., बी. एस्सी. (नर्सिंग) इत्यादी शैक्षणिक पात्रता असणारे १८ ते ३५ वर्षे वयोगटातील पुरुष व महिला मुलाखती घेवून प्राथमिक निवड केली जाणार आहे. सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी सुपरवायझर, स्टाफ नर्स, जनरल ड्युटी असिस्टंट, लॉजीस्टिक एक्झिक्युटिव्ह, ब्युटीपार्लर, गारमेंट आणि फॅशन डिझाईन क्षेत्रातील आय.टी.आय., अॅप्रेन्टिस, ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, फिल्ड ऑपरेटर, इन्शुरन्स अॅडव्हायझर इत्यादी विविध २03 पेक्षा जास्त रिक्त पदांवर त्याच दिवशी मुलाखत व व तत्सम प्रक्रीयाद्वारे प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या सत्यप्रती, नुकतीच काढलेली दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, सेवायोजन (एम्प्लॉयमेंट) कार्डसह १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्यास स्वखर्चाने उपस्थित रहावे. सेवायोजन कार्ड नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरून ऑनलाईन प्राप्त करून घ्यावे. अधिक माहितीसाठी अथवा काही अडचणी असल्यास समन्वयक सुशील काकडे (भ्रमणध्वनी क्र. ९५११६२०६७७), राजेंद्र पट्टेबहाद्दूर (भ्रमणध्वनी क्र. ९८५००९००५७ यांच्याशी किंवा कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे श्रीमती बजाज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



