क्षयरोग हरेल, देश जिंकेल

0
48

जागतिक क्षयरोग दिन विशेष

आज जगातिक क्षयरोग दिन. ‘दि कॉक इज टिकिंग’ हे यावर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य आहे. क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सर्वांची साथ मिळणे आवश्यक असून तसे झाले तर क्षयरोगावर आपण नक्कीच विजय मिळवू शकू.

क्षयरोग हा पुरातन काळापासूनचा संसर्गजन्य रोग आहे. त्याकाळी ह्या रोगावर प्रभावी औषधोपचार नसल्याने हा असाध्य व जीवघेणा रोग मानला जायचा. मात्र, आता क्षयरुग्णांना संजीवनी ठरणारी ‘डॉटस’ उपचार पद्धती संशोधकांनी विकसित केळी आहे. त्यामुळे क्षयरुग्ण पूर्णपणे बरा होवू शकतो. तरीही क्षयरोगाविषयी अज्ञान व अंधश्रद्धा असल्याने आजही या रोगाविषयी ग्रामीण भागातील लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे रुग्णालयात औषधोपचार घेण्याऐवजी मांत्रिक यांचा सल्ला, औषधोपचार घेण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. म्हणून ग्रामीण भागातील लोकांमध्ये क्षयरोगाविषयी असलेले अज्ञान, गैरसमज व अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्याची नितांत गरज आहे.

क्षयरोग म्हणजे काय?

‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ नावाच्या जिवाणूमुळे होणारा मुख्यतः फुफ्फुसावर परिणाम करणारा संसर्गजन्य रोग म्हणजे क्षयरोग. या रोगामुळे फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांवरही (उदा. हाडे, सांधे, मज्जातंतू) याचा परिणाम होतो. क्षयरोगाची बाधा झालेला रुग्ण जेव्हा खोकतो, थुंकतो त्यावेळी त्याच्या शरीरातील जीवाणू बाहेर पडून हवेत पसरतात. हे जीवाणू निरोगी माणसाच्या श्वासाबरोबर त्यांच्या शरीरात प्रवेश करतात व त्याला क्षयरोगाचा संसर्ग होतो.

भारतात प्रत्येक वर्षी जवळपास २९ लाख नवीन क्षयरोगी असतात. त्यापैकी १० क्षयरोगी थुंकी दुषित आहेत. एका वर्षात एका थुंकी दुषित रूग्णामुळे १० ते १५ लोकांना क्षयरोग होवू शकतो. दररोज अंदाजे ५ हजार लोकांना क्षयरोग होतो. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्तीचा हळूहळू ऱ्हास होत असल्याने अशा एचआयव्ही बाधित लोकांमध्ये ६० टक्के लोकांना क्षयरोग होण्याची शक्यता असते.

क्षयरोगाची लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची थुंकी (बेडका) तपासणी व एक्स-रे तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आता सीबीनॅट मशीनद्वारे दोन तासांमध्येच एमडीआर टीबीच्या आजाराचे निदान होऊन लवकर उपचार सुरु होण्यास मदत होत आहे. क्षयरोगावर आता अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये दैनंदिन उपचार पद्धत नव्याने सुरु झालेली असून महाराष्ट्रात देखील ही उपचार पद्धती राबविण्यात येत आहे. उपचाराचा कालावधी लक्षणानुसार ६ ते ८ महिने इतका आहे. यामध्ये क्षयरोगाचे औषधी रोज देण्यात येतात व गोळ्यांची संख्या देखील कमी झाल्याने क्षयरोगाचा उपचार घेणे अधिक सोयीस्कर झाले आहे. दैनंदिन उपचार पद्धतीमध्ये रुग्ण व्यवस्थित गोळी घेतो की नाही, यासाठी रुग्णास दैनंदिन गोळी घेतांना त्याखालील दिसणाऱ्या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागतो. यामुळे रुग्णांवरील उपचाराचे संनियंत्रण व्यवस्थित होत होते. औषधोपचारात खंड पडत नाही. खंड पडलेल्या रुग्णास लगेच संपर्क साधून औषधी घेण्याचा सल्ला दिला जातो.

क्षयरोगाची लक्षणे

  • दोन आठवड्यापेक्षा जास्त मुदतीचा खोकला
  • संध्याकाळी बारीक ताप येणे
  • भूक मंदावणे, छातीत दुखणे, वजनात घट होणे.
  • खोकल्यातून, थुंकीतून रक्त पडणे.
  • मानेला गाठी येणे.

–         जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम