35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Featured News हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक

हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक

0
127

blank

    – भिमाशंकर पाटील,उपविभागीय कृषि अधिकारी,गोंदिया

वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग तर आईचे नाव होनूबाई असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गहुली व आसपासच्या खेड्यात तर माध्यमिक शिक्षण विठोली व अमरावती येथे झाले. 1938 मध्ये नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर 1940 ला त्यांनी एल.एल.बी.ची पदवी मिळवली. 1941 ला त्यांनी आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या पत्नीचे नाव वत्सलाबाई असे होते.

वसंतराव नाईक यांनी कायदयाचे शिक्षण पूर्ण करुन पुसद येथे वकीलीस सुरुवात केली. वकीलीत त्यांचा जम बसू लागला. याच काळात ते सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होवू लागले. 1946 ते 1952 या काळात त्यांनी पुसदचे नगराध्यक्ष पद भुषविले. सन 1951-52 मध्ये तत्कालीन मध्य प्रांताच्या सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1952 मध्ये तत्कालीन मध्य प्रांताच्या विधानसभेवर ते निवडून आले व पंडीत रविशंकर शुक्ल यांच्या मंत्रीमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. 1956 ला राज्य पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या मुंबई राज्याच्या यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात ते 1957 मध्ये कृषिमंत्री झाले. सन 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांना महसूल या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली. महसूल मंत्री असतानाच सतेच्या विकेंद्रीकरणसाठी नेमलेल्या पंचायत राज समितीचे ते अध्यक्ष होते. या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली व त्यानुसार महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 हा कायदा विधीमंडळाने पारीत केला व राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. म्हणूनच राज्यातील पंचायत राज व्यवस्थेचे त्यांना जनक असे संबोधले जाते. 1962 मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षण मंत्री बनल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी मारोतराव कन्नमवार विराजमान झाले. यावेळीही वसंतराव नाईक यांच्यावर महसूल खात्याचीच जाबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांची कारकीर्द अल्पजीवी ठरली, कारण 1963 मध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर 5 डिसेंबर 1963 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी वसंतराव नाईक विराजमान झाले. त्यांनी हे पद 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत म्हणजे जवळपास एक तप एवढ्या प्रदीर्घ काळासाठी यशस्वीरित्या सांभाळले. 1977 मध्ये आणीबाणी नंतर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ते वाशिम मतदारसंघातून निवडून आले होते. 18 ऑगस्ट 1979 रोजी त्यांना देवाज्ञा झाली.

वसंतराव नाईक यांनी आपल्या मंत्री व मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्याच्या विकासाच्या अनेक योजना राबविल्या. राज्याचा विकास करावयाचा असेल तर पायाभुत सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी हेरले व त्या उभारण्यावर त्यांनी विशेष भर दिला. शेती हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. कृषिमंत्री असतांना त्यांनी जपानचा दौरा केला होता. जपानी भात शेती पाहून ते खुप प्रभावित झाले. त्यांनी ते तंत्रज्ञान राज्याच्या शेतीत आणले. त्यासाठी आयोजित प्रात्यक्षिकांना ते आपल्या व्यस्त दिनचर्यातून वेळ काढून आवर्जुन उपस्थित राहत असत. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये राज्यात कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यासाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भासाठी चार स्वतंत्र कृषि विद्यापीठ निर्माण झाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेती करण्यासाठी बियाणे, खते, किटकनाशके, सुधारित अवजारे यांचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी महाबीज, महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग विकास महामंडळ यासारख्या महामंडळाची निर्मीती केली. आपला देश व राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी अतोनात परिश्रम घेतले. संकरीत बियाणांचा वापर केल्याशिवाय अन्नधान्यात स्वयंपूर्णता गाठणे कठीण आहे हे त्यांनी ओळखले होते म्हणून ते संकरीत बियाण्याच्या वापराचा हिरहिरीने पुरस्कार करत असत. सन 1972 मध्ये देशात अभुतपूर्व असा दुष्काळ पडला परंतू याही कठीण परिस्थितीमध्ये राज्यातील जनतेला त्यांनी भक्कम आधार दिला. लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी अनेक सरकारी कामे सुरु केली. जलसंधारणाची, पाझर तलावाची अनेक कामे हाती घेतली. त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्याने दुष्काळाचा समर्थपणे मुकाबला केला. मागेल त्याला काम देणारी रोजगार हमी योजना त्यांच्याच कारकिर्दीत सुरु झाली. आता ही योजना देशभर राबवली जात आहे, यातच त्यांचे द्रष्टेपण आपणास दिसून येते. त्यामुळेच त्यांना राज्यातील हरितक्रांतीचे जनक असे संबोधले जाते. त्यांच्या या महान कार्याची नोंद घेत त्यांचा 1 जुलै हा जन्म दिन कृषि दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. अशा या हरितक्रांती व्यक्तीमत्वास त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन !

                                                                                          

blank