‘त्या’ हत्तीच्या पिल्लाचे नाव ‘लक्ष्मी’

0
40

गडचिरोली,दि.12 जानेवारी- कमलापूर हत्तीकॅम्पमध्ये शनिवारी प्रियंका या हत्तीणीने जन्म दिलेल्या पिलाचे सिरोंचा वन विभागाचे उप वनसंवरक्षक सुमित कुमार यांच्या शुभहस्ते नामकरण सोहळा संपन्न झाला. नव्याने कमलापूर हत्ती कॅम्प मध्ये दाखल झालेल्या ‘त्या’ हत्तीच्या पिल्लाचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले.

अहेरी तालुक्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्प हे महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. गेल्या दोन वर्षात कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये असलेल्या दहा हत्तींपैकी आदित्य, सई आणि अर्जुन या तीन हत्तींच्या पिलांचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर येथे केवळ ७ हत्ती उरले होते. शनिवारी प्रियंका नावाच्या हत्तीणीने एका पिलास जन्म दिला असून आता या ठिकाणी हत्तींची संख्या ८ वर पोहोचली आहे.

रविवारी सिरोंचाचे उप वनसंवरक्षक सुमित कुमार यांच्या शुभहस्ते नवीन पाहुण्या हत्तीचे स्वागत करून नामकरण सोहळा संपन्न झाला. त्या हत्तीच्या पिलाचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. आता कमलापूर येथील शासकीय हत्तींकॅम्प मध्ये अजित, गणेश असे दोन नर हत्ती आणि बसंती, प्रियंका, मंगला, रुपा, राणी आणि लक्ष्मी अशा मादी मिळून एकूण ही संख्या ८ वर पोहोचली आहे.

नामकरण सोहळ्यात गडचिरोलीचे उप वनसंवरक्षक कुमारस्वामी, सिरोंचाचे उप विभागीय वन अधिकारी सुहास बडेकर, कमलापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद पझारे, वनपाल भारत निब्रड, हत्तीकॅम्पचे वनरक्षक राजकुमार बन्सोड, इतर वन रक्षक तसेच माहुवत व चारकटर आदी उपस्थित होते.