डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशासाठी मार्गदर्शक – मुख्यमंत्री

0
18

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक,आर्थिक विचार देशाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. या विचारांमुळे भारत जगातला प्रमुख देश बनला आहे. तो सर्वोत्तम करणे आपले काम असून डॉ.आंबेडकरांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने ‘डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत’ या विशेषांकाचे प्रकाशन आज सह्याद्री अतिथीगृहात झाले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, भारत सरकारच्या 125वी जयंती उच्चाधिकार समितीचे सदस्य भिकुजी इदाते, डॉ.भदंत राहुल बोधी महाथेरो, मिलिंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यघटनेविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देश एकसंध ठेवत देशातील सर्व भाषा, संस्कृती यांना समान बहुमान दिला आहे. बाबासाहेबांनी देशात विषमता राहू नये अशा प्रकारची राज्यघटना तयार केली आहे. आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण केल्यास देशातील सर्व समस्यांवर मात करणे शक्य आहे. या विशेषांकाच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचणार आहेत. या विचारांच्या मार्गावर चालून देश सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

डॉ.बाबासाहेबांचे लंडन येथील घर खरेदी केल्याबद्दल भिकुजी इदाते यांनी शासनाचे आभार मानले.यावेळी डॉ.भदंत राहुल बोधी म्हणाले, केंद्राने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती वर्ष साजरी करण्याचा घेतलेला निर्णय अभिनंदनीय आहे. कोणत्याही देशाचा विकास समता, बंधुता या मूल्यातूनच होत असतो. हे सर्व विचार बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिले आहेत. या विचारांच्या मार्गावर चालून देशाचा विकास करणे आपले कर्तव्य असल्याचे डॉ.राहूल बोधी म्हणाले.