Home Featured News इरई जलाशय बोटींग पर्यटकांचे आकर्षण बनेल – ना. मुनगंटीवार

इरई जलाशय बोटींग पर्यटकांचे आकर्षण बनेल – ना. मुनगंटीवार

0

चंद्रपूर-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील इरई जलाशयात वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेली बोटींग पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल असे प्रतिपादन वित्त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज इरई जलाशय बोटींगचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकार, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वनसंरक्षक जे.पी.गरड, उपसंचालक बफर झोन गजेंद्र नरवणे व उपसंचालक कोअर ए.एस.कळसकर यावेळी उपस्थित होते.

बोटींग पर्यटनामुळे बाजूबाजूच्या तीन गावातील लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. येणा-या पर्यटकांचे समाधान होईल तसेच त्यांना उत्तम सेवा मिळेल याची खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. स्वत:चे काम असे समजून हे काम करा असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, येथे येणा-या पर्यटकांना हा बोटींगचा अनुभव आनंद देणारा ठरावा.

यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी स्वत: 300 रुपये भरुन बोटींगचे तिकीट खरेदी केले व बोटींगचा आनंद घेतला. निसर्गरम्य अशा जलाशयात बोटींग करणे आनंददायी आहे असे ते म्हणाले. हाच अनुभव सर्व पर्यटकांना देण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहा असे ते म्हणाले.

Exit mobile version