धम्मचारी सुबुती यांचे प्रतिपादन; बुद्ध महोत्सवाचा थाटात प्रारंभ

0
14

नागपूर -‘बोधी वृक्षाखाली मानवीय संस्कृती निर्माण झाली, तीच धम्मक्रांती. बुद्धाच्या या क्रांतीपुढे अंधश्रद्धेतून प्रतिक्रांती तयार झाली. पुढे याच दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मपरिवर्तन करून धम्मक्रांती जिवंत केली. आज याच धम्मक्रांतीचा अर्थ समजून घेताना चिंतन करण्याची वेळ आली आली आहे’, असे मत धम्मचारी सुबुती यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दीक्षाभूमीवर आयोजित नऊ दिवसीय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्ध महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्‌घाटन भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर मेश्राम होते. धम्मचारी नागकेतू प्रामुख्याने उपस्थित होते.

सुबूती म्हणाले, ‘बुद्ध महोत्सवाचा अर्थ तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे चिंतन करणे हा आहे. तथागताच्या चेतना परिवर्तनाचे साधन आमच्याकडे आहे. यातून चांगली व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. देशात अनेक ठिकाणी होत असलेल्या पुरातत्वीय उत्खननात बुद्धकालीन अवशेष सापडत आहेत. यावरून भारताला बुद्धसंस्कृतीचा वारसा आहे. या महोत्सवातूनही बौद्धांच्या अखंडतेची ऊर्जा प्रसारित होते. ही ऊर्जा समस्त मानवी समाजाला बुद्धकलेतून जीवनसौंदर्याचा संदेश यापुढेही देत राहील, अशी सदिच्छा आहे. आम्हाला आता केवळ जयभीम… जयभीम म्हणून चालणार नाही. जयभीम हे बाबासाहेबांना अभिवादन आहे. हे अभिवादन करताना जयभीमच्या क्रांतीचा संघटितपणे गजर व्हावा. यातून सामाजिक चेतना समाजात प्रसारित होईल.’

भदन्त सुरेई ससाई यांनी पन्नास वर्षांपूर्वीचा त्रैलोक्‍य बौद्ध महासंघ आणि आताचा त्रिरत्न बौद्ध महासंघ यांची तुलना करीत, बौद्ध समाज आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या उपासकांनी एकत्र काम करताना समन्वय साधावा, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. सुनील तलवारे यांनी केले. संचालन ऋतायुष यांनी केले.