जपानमध्ये उभारणार बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

0
9

मुंबई, दि. २2 – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जपानमधील ‘कोयासान’ या बौद्ध केंद्रात उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाचा जगभर प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळा’ने पहिले आंतरराष्ट्रीय कार्यालय टोकियो येथे सुरू केले आहे. सर्व जगाला दया व शांतीचा संदेश देणा-या गौतम बुद्धांना मानणा-या पूर्वेकडील देशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेत असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असलेल्या ‘कोयासान’ येथे बाबासाहेबांचा ब्राँझचा पुतळा ठेवण्यात येणार आहे.
६ फूट २ इंच इतकी उंची असलेल्या या पुतळ्याचे ५० टक्के काम झाले असून मार्च अखेरीपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर एप्रिल ते मे महिन्यादरम्यान तो एअरलिफ्ट करून कोयासान येथे ठेवण्यात येईल. हा पुतळा उभारण्याचे काम सध्या सिंधुदुर्ग येथे सुरू आहे. हा पुतळा उभारण्यासाठी सुमारे २५ लाख रुपयांचा खर्च येणार असून, एअरलिफ्टींगद्वारे कोयासान येथे स्थापन करणे व अन्य गोष्टींसाठी सर्व मिळून एकूण ४४ लाख रुपये खर्च होणार असून राज्य सरकार तो खर्च उचलणार असल्याचे समजते.
महाराष्ट्र पर्यटन मंडळाच्या टोकियो येथील कार्यालयाप्रमाणेच वाकायामा टुरिझम फेडरेशनेनेही (वायटीएम) औरंगाबाद येथे कार्यालय उघडण्यात आले आहे.
महाराष्ट्र व जपान यांच्यातील व्यापारउदीमासोबतच पर्यटन क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी एमटीडीसी व वायटीएफ यांच्यादरम्यान गेल्यावर्षी एक सामंजस्य करार झाला होता. त्याचाच भाग म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्थापन करण्यात येणार आहे. भारताबाहेर डॉ. आंबेडकरांचा हा पहिलाच पुतळा असेल, असे राज्य पर्यटन सचिव व एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक वलसा नायर सिंग यांनी सांगितले.
दरम्यान लंडनमध्ये शिक्षण घेताना बाबासाहेबांनी ज्या घरात वास्तव्य केले होते, त्या ऐतिहासिक घराचा लिलाव रोखावा आणि शासनाने ते घर विकत घ्यावे अशी मागणी काही महिन्यांपूर्वी झाली होती. घर विकत घेण्याची इच्छा तत्कालीन आघाडी सरकारने केंद्र्ला कळवली होती, मात्र सरकारकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ही वास्तू लिलावात काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या.