ऑनलाईन सुविधेच्या वापरामुळे विधीमंडळाच्या कामकाजात पारदर्शकता येईल – रामराजे नाईक-निंबाळकर

0
17

अधिवेशनातील लक्षवेधी, तारांकित प्रश्न ऑनलाईन पाठविण्याचा शुभारंभ

मुंबई दि.७: विधी मंडळाच्या अधिवेशन काळातील तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना या ऑनलाईन देण्याच्या सुविधेमुळे विधीमंडळाचे कामकाज पेपरलेसच्या दिशेने सुरू असून त्यामुळे आमदारांचा वेळ वाचेल व कामकाजात पारदर्शकता येईल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

अधिवेशन काळातील सर्व संसदीय आयुधांच्या सूचना ऑनलाईन देण्याबाबत महाराष्ट्र विधीमंडळाच्या सदस्य व त्यांच्या स्वीय सहायकांसाठी विधानमंडळाच्या वतीने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे तसेच दोन्ही सभागृहाचे सदस्य व त्यांचे स्वीय सहायक उपस्थित होते.

श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, देशात प्रथमच महाराष्ट्र विधीमंडळाने ऑनलाईन प्रश्न व सूचना पाठविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. संसदीय कामकाजात लक्षवेधी सूचना, तारांकित व अतारांकित प्रश्न आदी १३ आयुधे आहेत. ही आयुधे वापरण्यासाठी आता आमदारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून जनतेला न्याय मिळवून द्यावा. त्यासाठी आमदारांनी स्वतःबरोबरच आपल्या स्वीय सहायकांना या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे.

श्री. बागडे म्हणाले, काही दिवसापूर्वीच लोकसभेच्या अध्यक्षांनी पेपरलेस पार्लमेंटविषयी परिषद आयोजित केली होती. त्यानंतर महाराष्ट्राने यात पुढाकार घेऊन त्या दिशेने पाऊल उचलले आहे. या सुविधेमुळे कागद आणि वेळ वाचण्यास मदत होणार आहे. ऑनलाईन सुविधेचा वापर करताना विधीमंडळाच्या सदस्यांनी नेमका व अचूक प्रश्न विचारावा, जेणेकरून त्याचे उत्तरही अचूकपणे मिळेल. येत्या नागपूर अधिवेशनात जास्तीत जास्त सदस्यांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करून आपले प्रश्न पाठवावेत.

श्री. बापट म्हणाले, देशात महाराष्ट्रातील संसदीय कार्य विभागाचे कामकाज अव्वल आहे. येथील कामकाज पद्धती, यंत्रणा इतर राज्यांनीही अभ्यासावी अशा प्रकारची आहे. त्यामुळे विधीमंडळ व संसदीय कार्य विभाग पेपरलेस होण्याच्या दृष्टिने ऑनलाईन सुविधाचे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. विश्व संगणकीकरणात पुढे जात असून आपणही त्याचा स्विकार करून आदर्श संसदीय कामकाज व आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालावी. या प्रणालीचा वापर करताना मानवी भावभावनांचाही विचार सदस्यांनी करावा. विधीमंडळाचे कामकाज व संसदीय कामकाजात आणखी सुधारणा करण्यात येणार असून त्यासाठी संसदीय कार्य विभाग हा स्वतंत्र करून स्वतंत्र सचिव नेमण्यात यावा, असेही श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ऑनलाईन सुविधा कशा प्रकारे वापरावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले. विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. कळसे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.