सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
6

सहकार तपस्वी दिवंगत गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सोहळा

मुंबई, दि. १६ : संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही. असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा आणि दोष दूर करण्यासाठी आणि सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषदेच्या आयोजनातून विचारमंथन घडवून आणावे अशी सूचनाही केली.

जन्मशताब्दी सोहळा समिती आयोजित व वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र विधानभवन यांच्या संयोजनाने सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या “प्रेरणोत्सव” कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान  परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, जन्मशताब्दी सोहळा समितीचे कार्याध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्वागताध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कार्याध्यक्ष तथा राज्यमंत्री सर्वश्री विश्वजीत कदम, सतेज पाटील, शंभुराज देसाई, समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील, विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह विधानमंडळ सदस्य, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जीवनकार्यावरील चित्रफितीचे अनावरण झाले.

आपण बोलून दमून जावे एवढे भव्य काम एखादी व्यक्ती आयुष्यात करू शकते हे दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या कामातून दिसून येते. त्यांनी आयुष्य कमी पडेल एवढे भले मोठे काम सहकारात करून दाखवले असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  महाराष्ट्राला उभे करण्याचे काम दिवंगत गुलाबरावांनी केले. त्यांचा राज्याला उभे करण्याचा विचारच क्रांतीकारक आहे.  सहकार हे असे क्षेत्र आहे ज्यातून सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात समृद्धी आणता येते. त्यामुळे ही चळवळ अधिक चांगल्याप्रकारे पुढे नेताना जर सहकार क्षेत्रात चुका करून काही लोक ही चळवळ अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा प्रवृत्तींना नाहीसे केले पाहिजे. सहकारात देखील बदल घडण्याची गरज असून सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी सरकार नक्कीच खंबीरपणे सहकार क्षेत्राच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही  श्री.ठाकरे यांनी दिली.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, सहकार हा सिद्धांत आहे हे पटवून देण्याचे कार्य दिवंगत गुलाबराव पाटील यांनी केले. सहकाराचा इतिहास आणि २१ व्या शतकातील सहकारातील आव्हाने यांचे समीकरण जुळवून  बदल घडवून आणणे आवश्यक आहे. सहकार कार्यकर्त्यांची नाविन्यपूर्ण चळवळ भविष्यात होणे गरजेचे आहे. गुलाबराव पाटील यांची कारकीर्द आणि त्यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा केवळ उल्लेख न करता त्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणे गरजेचे आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, सहकार क्षेत्रात भरीव काम करून दिशा देण्याचे कार्य गुलाबराव पाटील यांनी केले. सहकार क्षेत्राला उर्जितावस्था देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सहकार चळवळीच्या दृष्टीने हा दिशादर्शक कार्यक्रम असल्याचा उल्लेखही श्री.दरेकर यांनी यावेळी केला.

महसूल मंत्री तथा समितीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, दिवंगत गुलाबराव पाटील हे  राज्यातील सहकार, राजकारण क्षेत्रातील आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्व होते. सहकार क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गुलाबराव पाटील यांच्या उल्लेखाशिवाय  तो पूर्ण होऊ शकणार नाही. गुलाबराव पाटील यांनी जो सहकाराचा विचार रूजविला तो पुढे नेणे काळाची गरज आहे.

जलसंपदा मंत्री तथा स्वागताध्यक्ष जयंत पाटील म्हणाले,  सहकारी चळवळीकडे  आपुलकीने पहायला हवे. आज महाराष्ट्रातील सहकार चळवळ वेगळ्या वळणावर आहे. सरकारने गुंतवणूक करून ज्या संस्था सुरू केल्या  त्या संस्थांच्या सध्याच्या स्थितीबाबतचा अभ्यास करायला हवा. समाजातील तळागाळातील लोकांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केल्या, त्यांच्या हिताच्या रक्षणासाठी सहकार चळवळ जगवण्याचे काम व्हायला हवे. सहकार क्षेत्रात अलिकडे नवीन बदल घडत आहेत. त्यामुळे  नागरी सहकारी  बँका आणि सहकाराचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. दिवंगत गुलाबराव पाटील यांनी सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी आयुष्य समर्पित केले. सहकारात चांगले काम करणाऱ्या प्रवृत्तीला जपण्यासाठी आजचा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे असेही ते म्हणाले. सरळमार्गी, नेमस्त स्वभावाच्या  गुलाबराव पाटील यांच्या कामाचा साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला काही वर्षे मिळाले असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

सहकार राज्यमंत्री तथा समितीचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम म्हणाले, सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम गुलाबराव पाटील यांनी केले. सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्याचे त्यांनी काम केले. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जेथे सहकार चळवळ सुरू झाली. गुलाबराव पाटील यांच्या सहकार चळवळीचा वारसा तरूण पिढीने पुढे नेण्याचे काम करायला हवे.

दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जीवनकार्याची माहिती चित्रफितीतून देण्यात आली. सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांचा जन्म तत्कालीन मुंबई प्रांताच्या बेळगाव जिल्ह्यातील बेनाडी या गावी १६ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. गुलाबरावांचे प्राथमिक शिक्षण बेनाडीतच झाले. १९३८ मध्ये ते कोल्हापूरात मॅट्रिक उत्तीर्ण होऊन अर्थशास्त्र व इतिहास विषयात राजाराम कॉलेजमधून बी.ए.झाले. १९४५ मध्ये ते कायदा पदवीधर झाले. १९४५ ते १९४९ या काळात त्यांनी साताऱ्यात वकिली केली. ते १९५४ मध्ये नगराध्यक्ष झाले. त्यांनी राज्यसभेचे सदस्य तसेच विधानपरिषदेचे सदस्यपदही त्यांनी भुषविले. सहकार चळवळीतला नागरी अर्बन बँक हा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. निराधारांना पेंन्शन सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. सहकार चळवळीचा पाया त्यांनी राज्यात रचला. शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले.

दिवंगत गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव समितीचे कार्यकारी सचिव पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविकात त्यांच्या कार्याला उजाळा दिला. आभार श्री अंकुश ठाकरे यांनी मानले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे पाठविलेला संदेश पृथ्वीराज पाटील यांनी वाचून दाखविला.