शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा – उद्धव ठाकरे

0
7
मुंबई, दि. १२ – शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा आहे, ते बुद्धीबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार या शब्दांमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पवारांच्या अमृतमहोत्सवी समारंभांच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. शरद पवारांकडून शिकण्यासारखे खूप आहे असं सांगताना ठाकरे यांनी पवारांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांचे मन:पूर्वक अभीष्टचिंतन केले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, पवार कोणत्याही पदावर नाहीत. तरीही देशाच्या राजधानीत शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतनाचा जंगी सोहळा दोन दिवस आधीच झाला. मराठी नेत्याचा इतका जंगी सोहळा देशाच्या राजधानीत कधीच झाला नसेल. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुलायम सिंग यादव, लालू यादव, पंजाबचे मुख्यमंत्री बादल, लालकृष्ण आडवाणी, फारुख अब्दुल्ला, नितीशकुमार, देशाचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्यास पवारांच्या अभीष्टचिंतनासाठी हजर होते. पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात जे पेरले ते या सोहळ्यात उगवलेले दिसले, अशा शब्दात पवारांचे कौतुकही करण्यात आले आहे.