सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल- पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

0
13
  • महाराष्ट्र दिनाचे मुख्‍य शासकीय ध्‍वजारोहण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते संपन्न
  • रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ हिरज ता. उत्तर सोलापूर येथे होणार
  • मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत एकूण 33 कामांचा समावेश
  • शहर पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत कम्युनिटी पोलिसिंगचा नाविन्यपूर्ण उपक्रम
  • कोरोना संपलेला नाही, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे

सोलापूर, दि.1(जिमाका): विकासाकडे वाटचाल करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्याचा सर्वंकष विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, सामान्य प्रशासन, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री श्री.भरणे यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.भरणे म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास, पाटबंधारे, वीजपुरवठा यांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. या कामातून नागरिकांच्या जीवनाचा स्तर उंचावेल. शहराला मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी दुहेरी पाईपलाईनच्या कामाची निविदा प्रक्रिया निघाली आहे. राज्य शासनाने या प्रकल्पास प्राधान्य दिले आहे. यामुळे सोलापूरकरांना रोज मुबलक पाणी मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकरी रेशीम लागवड करण्यासाठी आकर्षित होत असून 119 गावातील 479 शेतकऱ्यांनी 530 हेक्‍टर क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. यातून 1 लाख 75 हजार किलोग्रामचे कोष उत्पादन केले आहे. रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ हिरज, तालुका उत्तर सोलापूर येथे उभारण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी 6 कोटी 47 लाखांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आला आहे. ही बाजारपेठ लवकरच कार्यान्वित होणार आहे. स्थानिकस्तरावरच रेशीम बाजारपेठ उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील शेतकरी रेशीम लागवडीतून चांगले उत्पादन घेतील, अशी अपेक्षा पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त्त केली.

भूमी अभिलेख कार्यालयातील संपूर्ण अभिलेखांचे स्कॅनिंग झाले असून नागरिकांना लवकरच अभिलेखे आणि मिळकत पत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. उर्वरित तालुक्यातील मिळकतींचा सर्व्हे लवकरच पूर्ण होणार आहे, असे श्री भरणे यांनी सांगितले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत कम्युनिटी पोलिसिंगचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमातून पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध दृढ होऊन पोलिसांवरील विश्‍वास अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे सांगून भरणे म्हणाले, ग्रामीण पोलीस विभागाने ऑपरेशन परिवर्तन राबवून अवैध हातभट्टीची दारूची निर्मिती 80 टक्क्याने कमी केली. जिल्ह्यातील हातभट्टी व्यवसायातील 600 कुटुंबापैकी 443 कुटुंबांचे पुनर्वसन केले. जे हात वर्षानुवर्षे हातभट्टीची दारू तयार करण्यात आणि विकण्यात गुंतले होते, ते हात आता ब्रँडेड कपडे शिवणार आहेत. त्यांनी शिवलेला शर्ट परदेशात पाठविण्याची जबाबदारी एका गारमेंट कंपनीने घेतली आहे. शिलाई मशिनसह ब्युटिशियनचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येत आहे. यामुळे रोजगारातून महिलांचे सक्षमीकरण होऊ लागले असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरणांतर्गत कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरण्यास वीज बील कोरे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या धोरणांतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 34 हजार 388 कृषी ग्राहकांनी 282 कोटींचा भरणा केलेला आहे. याअंतर्गत या सर्व ग्राहकांना 972 कोटींची माफी मिळाल्याचेही श्री. भरणे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून विविध कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत मागील पाच वर्षात 14 हजार 597 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. सन 2021-22 मध्ये 3 हजार 92 घरकुलाच्या उद्दिष्टापैकी 2 हजार 641 घरकुलांना मंजुरी देऊन सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात पुढाकार घेत आहे. जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी श्री. भरणे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये एकूण 1019 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 132 ग्रामपंचायतींना कार्यालयीन इमारत नाही. स्मशानभूमी शेड नसलेली 90 खेडी आहेत. पाणीपुरवठा, कंपाउंड, निवारा शेड अशा सुविधा स्मशानभूमीत नाहीत अशी 615 खेडी आहेत. जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीची दुरवस्था आहे. बाब लक्षात घेवून जिल्हास्तरावर सन 2022-23 साठी सुमारे 21 कोटींची तरतूद ठेवण्यात आली असून आणखी दहा कोटी वाढीव निधीही देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अशा गावातील स्मशानभूमीच्या निवाऱ्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे मत श्री. भरणे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत एकूण 33 कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत “हर घर नल से जल”  2024 अखेर प्रत्येक घरात नळाद्वारे 55 लिटर प्रति माणसी प्रतिदिनी प्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यात मागील वर्षी 1 लाख 80 हजार कुटुंबांना तर यावर्षी 75 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती भरणे यांनी दिली.

जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रत्येक विभागामार्फत कार्यक्रम घेतले जात आहेत. कोरोनाची चौथी लाट जगातील काही देशात व भारतातही येऊ घातली आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रतिबंध चांगल्या पद्धतीने करून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तसेच या कालावधीत जवळपास 28 हजार बेडची निर्मिती केली असून 193 मेट्रिक टन ऑक्सीजन साठवण क्षमता निर्माण केली आहे. जिल्ह्यातील 85 टक्केपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले असून उर्वरित सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोनाचा पूर्णपणे नायनाट झालेला नसून नागरिकांनी कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री भरणे यांनी केले.

प्रारंभी महाराष्ट्र राज्याचा 62 व्या वर्धापन दिनानिमित्त सकाळी आठ वाजता पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या समवेत पालकमंत्री भरणे यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड कमांडर टिपरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाच्या 12 प्लाटूनने पथसंचलन केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार, कामगार, विद्यार्थी व सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिल्या. त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी उपस्थित मान्यवरांची भेट घेतली.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पोलीस पदक विजेते तसेच क्रीडा पुरस्कार व महसूल विभागाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.