एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

0
33

पुणे, दि. 10: आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून असून राज्यातील प्रत्येक गावाने विधवा प्रथा मुक्तीचा ठराव करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने  खडकवासला परिसरातील धायरीसह एकूण २९ ग्रामपंचायतींनी आज विधवा प्रथा बंदी करणारा ठराव मंजूर केला. यावेळी धायरी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामशिंग गिरासे, तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के उपस्थित होते.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिला आयोगाच्यावतीने राज्यात बालविवाह, गर्भलिंग निदानचाचणी, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, विधवा, एकल महिला यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच महिलांना समान दर्जा देण्यासाठी व समाजातील कुप्रथा बंद करण्याचे काम सुरू आहे. खडकवासला मतदार संघातून शंभर टक्के विधवा प्रथा बंद करण्याचे ठराव होणे कौतुकास्पद आणि मार्गदर्शक आहे. राज्यातील गावागावात असे ठराव  होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजात महिलांना समान दर्जा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. गुप्ता म्हणाले, समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी आपला सर्वांचा पुढाकार आवश्यक आहे. समाजातील कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. समाजातील कुप्रथा बंद करण्यासाठी सर्व मिळून एकत्रित करावे, असेही ते म्हणाले.

महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार म्हणाले, खडकवासला विभागातील अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथे विरुद्ध ठराव  केला. २९ ग्रामपंचायतींचा कुप्रथा बंद करून महिलांना सन्मान देणारा हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. एकाच वेळी ठराव करणारा  राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. विधवा महिलांना समान अधिकार आहेत. गावातील सरपंच, महिला यांनी यासाठी पुढाकार घेतला ही अभिनंदनीय बाब आहे. राज्यातील गावागावात असे उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख म्हणाले, स्री पुरुष समानतेचा इतिहास लिहला जाईल, त्यावेळी या ऐतिहासिक कार्यक्रमाची त्यात निश्चितपणे नोंद असणार आहे. कायद्यासोबतच अनुरूप असे सामाजिक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आजच्या या ठरावाच्या कार्यक्रमातून लोकचळवळ उभी राहील, महिलांना सन्मान देणारी चांगली सुरुवात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

महिला आयोगाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.महिला आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. कानडे, तहसीलदार श्रीमती कोलते,सरपंच मोनिका पडेर, राहुल पोकळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक,महिला आदी  उपस्थित होते.

एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायतीनी केला विधवा प्रथेविरुद्ध ठराव

राज्य महिला आयोगाने विधवा प्रथासारख्या  अनिष्ट  प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला राज्यभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे.  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने  खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व काही प्रभागातील नागरिकांनी आज हा ठराव मंजूर केला आहे.  खडकवासला  हा महाराष्ट्रातील १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा पहिला  मतदारसंघ असणार आहे.