वारीसाठी पोलीस प्रशासनही सज्ज;👉पालखी मार्गाच्या वाहतुकीत बदल

0
17

पुणे :-संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा उत्साह सध्या दिसून येत आहे. तुकोबाराय महाराजांची पालखी आज दुपारी देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे.यानिमित्त प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त असणार आहे. विशेषत: ग्रामीण पोलिसांतर्फे वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये करण्यात येणारे वाहतुकीचे बदल आणि उपलब्ध पर्यायी मार्गांची माहिती आणि एकूणच वारीदरम्याच्या घडामोडी यावर पुणे पोलिसांतर्फे व्हिडिओदेखील तयार करण्यात आला आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी त्याचप्रमाणे मुक्काम असणाऱ्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डाव्या बाजूने चालावे…

प्रत्येक पालखी तळावर पोलीस मदत केंद्र असणार आहे. कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास 112 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. उजव्या मार्गाने वारीतील वाहने जातील. स्टॉलधारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूला लावावेत. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी दर्शनासाठी स्त्री आणि पुरूष यांच्यासाठी वेगळी रांग असेल. प्रत्येकाने रांगेतूनच दर्शनासाठी जावे.

वाहतुकीत बदल

➖25 जूनरोजी पहाटे 2 ते रात्री 10 दरम्यान पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने पुणे, वाघोली, केसनंद, राहू, पारगाव, चौफुला या पर्यायी मार्गाचा वापर करतील. तर सोलापूरहून पुण्याकडे येणारी वाहनेदेखील याच मार्गाचा वापर करतील.

➖26 जूनरोजी पहाटे 2 ते रात्री 10 दरम्यान पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने पुणे, थेऊर फाटा, केसनंद, राहू, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड, कुरकुंभ या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

➖27 जून रोजी पहाटे 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला, पारगाव, न्हावरे, काष्टी, दौंड, कुरकुंभ या पर्यायी मार्गाने जातील.

➖27 आणि 28 जूनरोजी पहाटे 2 ते रात्री 9.30पर्यंत बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे मार्ग बंद राहतील. ही वाहतूक भिगवणमार्गे बारामतीला जाईल. बारामती ते पाटसला जाणारी वाहने लोणीपाटी, सुपा, चौफुला आणि पाटस या पर्यायी मार्गाचा वापर करतील.

➖29 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा मार्ग बंद असणार आहे. वालचंदनगर आणि इंदापूरहून येणाऱ्या वाहनांनी जंक्शन येथून कळसमार्गे बारामती या मार्गाने जावे.

➖30 जून आणि 1 जुलैरोजी पहाटे दोन ते रात्री दहावाजेपर्यंत बारामतीहून इंदापूरकडे जाणारी वाहने कळंब, बावडा, इंदापूर अथवा बारामती, भिगवण इंदापूर या मार्गाचा वापर करतील.

➖2 जुलैरोजी पहाटे दोनते रात्री दहावाजेपर्यंत निमगाव केतकी ते इंदापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. इंदापूरहून बारामतीकडे जाणारी वाहने लोणी देवकर, कळस, जंक्शनमार्गे बारामती किंवा लोणी देवकर, भिगवणमार्गे बारामती या मार्गाचा वापर करतील.

➖तीन जुलैरोजी इंदापुरातील जुना पुणे-सोलापूर रोड बंद राहील. त्याऐवजी मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक या बायपास मार्गाचा वापर करावा.

➖चार जुलैरोजी इंदापूर ते अकलूज मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. त्याऐवजी इंदापूर, हिंगणगाव, टेम्भूर्णी, गणेशगाव, मलिनगर, अकलूज तसेच नातेपुते, वालचंदनगर, जंक्शन, सोलापूर हायवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

➖पाच जुलैरोजी बावडा ते अकलूज हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्याऐवजी अकलूज, मलिनगर, गणेशगाव, टेम्भूर्णी, हिंगणगाव, इंदापूर तसेच अकलूज, नातेपुते, वालचंदननगर, जंक्शन आणि सोलापूर हायवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

👉संशयास्पद आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

या काळात काही संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या कोविडच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, अशी विनंतीही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.