शासन निर्णयांचा खुलासा करा:राज्यपालांचे सरकारला निर्देश

0
53

मुंबई,दि.28ः- शिवसेनेत बंड झाल्यानंतरच्या दोन दिवसांत राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना सोमवारी (२७ जून) नोटीस बजावली असून याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सदर निर्णयात 1 जुर्ले रोजी शेतकर्यांच्या खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्याबाबतचाही शासन निर्णय असून दरेकरांच्या या तक्रारीमुळे पुन्हा शेतकर्याना वाट बघावी लागणार आहे.

२२, २३ आणि २४ जून या दिवशी राज्य शासनाने मोठ्या संख्येने शासन निर्णय, परिपत्रके जारी केली होती. सुमारे १६० पेक्षा जास्त निर्णयांचे आदेश शासनाने अवघ्या तीन दिवसांत जारी केले होते. सरकार जाण्याच्या भीतीने घाईघाईत हे निर्णय जारी केले असल्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांकडे २४ जून रोजी तक्रार केली होती. हे सर्व निर्णय संशयास्पदरीत्या घेतले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केले म्हणजे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासन निर्णय जारी करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा गैरवापर होण्याची शक्यता दरेकर यांनी व्यक्त केली होती. दरेकर यांच्या या तक्रारीची दाखल घेऊन राज्यपालांनी याबाबत कारणमीमांसा स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.