लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही:मुख्यमंत्री शिंदें

0
16

मुंबई– लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी घणाघात केला. बहुमत चाचणी जिंकल्यानंतरच्या अभिनंदन प्रस्तावावर शिंदे यांनी अतिशय दिलखुलासपणे टोलेबाजी केली. त्यामुळे कधी हास्य, कधी टाळ्या आणि कधी धीरगंभीर वातावरण पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या सोबत आलेल्या 50 आमदारांचे पहिले आभार व्यक्त करतो. मला वाटले नव्हते, की मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी बसू शकेन. या ऐतिहासिक घटनेची नोंद 33 देशांनी घेतलीय. आम्ही सत्तेतून मंत्रिपदे दावावर लावून बाहेर पडलो. आमदारांनी सत्ता आणि यंत्रणेच्या विरोधात बाळासाहेबांच्या सैनिकावर विश्वास ठेवला. या 50 आमदारांनी मला काहीच न विचारता मला साथ दिली. बाळासाहेबांनी सांगितले होते अन्यायाविरोधात बंड करायचे. ते त्यांनी केले.

राऊत सारे विसरले…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे बाप काढले. आम्हाला शिवीगाळ करण्यात आली. मात्र, आम्ही चकार शब्द काढला नाही. शिवसेनेसाठी मी घर सोडले. घरातील माणसांची भेट होत नव्हती. संघटनेसाठी आयुष्याची 35 वर्षे घालवली. मात्र, हे एका क्षणात राऊत टीका करताना हे सगळे विसरले. मात्र, गेले पंधरा-वीस दिवस सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय घेण्याचे धाडस त्यांनी केले. त्यांचे मी मनापासून अभिनंद करतो. धन्यवाद देतो. मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही.

मुख्यमंत्र्यांचा कॉल आला….

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्या दिवशी निघालो त्याच्या अदल्यादिवशी मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्यादिवशी मतदान होतो. त्या दिवशी मला जी काही वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार आमदार आहेत. मला काय झाले माहिती नाही. बाळासाहेबांनी नेहमी सांगितले होते, अन्याय होत असेल तर बंड कर. माझे फोन सुरू झाले. लोक येऊ लागले. मुख्यमंत्री महोदयांचा देखील मला फोन होता. काही लपवू इच्छित नाही. मला विचारले कुठे चालला. मी म्हणालो, माहिती नाही. कधी येणार माहिती नाही. यापैकी एकाही आमदारांनी मला मुख्यमंत्री महोदयांना भेटू असे म्हटले नाही. हा विश्वास आहे. हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीय. यामध्ये सुनील प्रभूंना पण माहितीय माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

या जगाचा निरोप घेईन…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेना वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तर चालेल, पण आता माघार नाही. आमदारांना सांगितले होते, तुम्ही चिंता करू नका. ज्या दिवशी तुमचे नुकसान होते, त्या दिवशीय सांगेन. तुमचे भविष्य सुरक्षित करेन. या जगाचा निरोप घेऊन निघून जाईन. एक ग्रामपंचायत सैनिक इकडचा तिकडे जायची हिंमत करत नाही. हे का झाले, कशासाठी झाले हे पाहायला पाहिजे होते. ते पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारणारा पैदा झाला नाही. तसे केले तर मधमशासारखे मोहोळ उठेल. 20-25 वर्षे या एकनाथ शिंदेने जीवाचे रान, केले. रक्ताचे पाणी केले. 17 वर्षांचे असताना बाळासाहेबांच्या विचाराने वेडे केले. धर्मवीर आनंद दिघेंची भेट झाली. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी मी शाखाप्रमुख झालो. दिघे साहेबांनी खांद्यावर हात टाकला. मी त्यांना सांगितले. सीनियर लोकांना पद द्या. त्यांची एक भाष होती. मला शिवी घातली. मला शिकवतो का म्हणून मला शाखाप्रमुख बनवले.

माझा बाप काढला हो…

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, 1997 मध्ये मी नगरसेवक झालो. त्यानंतर काम केले कधीही मागे वळून पाहिले नाही. कुटुंब, घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो. आमचे बाप काढले, कोणी रेडा म्हणाले. कोणी प्रेते काढली. महिला आमदारांना वेश्या म्हणायचे. कुठल्या थराला जायचे. मी शांत असतो. पण जेव्हा अन्याय होतो. त्यावेळी मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले. मी आपल्याला सांगतो दादा, बाप काढले. माझे वडील जिवंत आहेत.

माझी दोन मुले गेली…

शिंदे म्हणाले की, मला एकदा उद्धव साहेबांनी फोन केला होता. आईला सांगितले. आईही त्यांच्याशी बोलली. आई साधीय. तिने त्यांना सांगितले, माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळचय. माझे वडील कष्ट करून पुढे आले. मी घरी जायचो तेव्हा आई-वडील झोपलेले असायचे. पंधरा दिवसांनी भेट व्हायची. हेच श्रीकांत सोबत झाले. त्याला बाप म्हणून वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला कुटुंब मानले. माझी दोन मुले मेली. त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी.

मुख्यमंत्री झाले भावुक…

एकनाथ शिंदे म्हणाले की, माझी तेव्हाची परिस्थिती कशासाठी जगायचे अशी होती. माझे आता काही राहिले नाही. आनंद दिघे माझ्याकडे एकदा-दोनदा पाचवेळा आले. त्यांना मी नाही उभा राहू शकत असे सांगितले. त्यांनी मला एका रात्री बोलावले. एकनाथ तू नाही म्हणू नकोस. तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसावे लागतील. अन् दुसऱ्याच्या डोळ्यांत येऊ नये यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यानुसार माझी वाटचाल सुरूय. बाळासाहेब, दिघे साहेब माझे दैवत होते. त्यांनी मला सभागृह नेता बनवले.

लेडीज बार बंद केले…

एकनाथ शिंदे म्हणाले, जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होते. तेव्हा त्यांना माहित होते. एकनाथ शिंदे वेड्यासारखा कामाला लागलाय. माझ्या पाठिशी दिघे साहेब होते. काही भीती नव्हते. त्यावेळेस लेडीज बारचा सुळसुळाट होता. पोलिसांना खूप प्रयत्न केला. मी सोळा लेडीज बार तोडले. माझ्यावर शंभर पेक्षा जास्तीच्या केसेस आहेत. हायकोर्टात माझ्याविरोधात पिटीशन दाखल झाली. त्यावेळेस मुंबईत गँगवॉर सुरू होतं. त्यावेळी ठरलं या एकनाथ शिंदेला ठार करायचा. त्यावेळी दिघे साहेबांनी काही अधिकाऱ्यांना बोलावले. एकनाथला काही झाले तर काही खैर नाही, असा इशारा दिला. मी आंदोलने केली. शिवसेना वाढवली. माझ्यासोबत जीवाला जीव देणारे कार्यकर्ते होते. ते कशाचीही पर्वा करायचे नाहीत. असे करताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला. त्यावेळेस मी साफ कोलमडून गेलो. मात्र, ही कोलमडून जाण्याची वेळ नाही.

एक दिवसांचे हे बंड नाही…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्षांत आम्हाला जो अनुभव आला, त्यामुळे हा निर्णय घेतला. अडीच वर्षांत एकदाही सावरकरांबाबत आम्हाला बोलता आले नाही. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला. तेव्हाही आम्हाला काँग्रेसचा विरोधात भूमिका घेता आली नाही. कारण आम्ही सत्तेत एकत्र होतो. या गोष्टींमुळे आमदार एकत्र आले. त्यांनी अन्यायाविरोधात बंड केले. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आहे. माझ्यासह 50 आमदार मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र आले आहेत. माझ्या विभागात सगळेच जण हस्तक्षेप करत होते, म्हणून मला अजित पवारांनी हस्तक्षेप केल्याचे वाईट वाटले नाही.

लालसेपोटी गेलो नाही…

शिंदे म्हणाले की, भास्करराव आम्ही गद्दार नाही. तुम्ही म्हटले म्हणून नाही सांगत मी. तुम्हाला मी म्हणालो. वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या आमदारांना हे माहिती होते. अजित दादांनी आणि कोणी सांगितले, की एकनाथ शिंदे नको. मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती. एकदा अजित दादा बोलता बोलता बोलून गेले. हो इथेपण अपघातच झाला आहे. आमचा विरोध असल्याचा कारण नाही. मी कधीही विचारलो नाही. मी सगळे विसरून गेलो. मला त्या पदाचा मोह नव्हता. काही अपेक्षाही केली नाही. सत्तेच्या मोहापायी, पदाच्या लालसेपोटी गेलो नाही. हा निर्णय घेतला यामागचे कारण ज्या पद्धतीने जे सुरू होते. निवडून झालेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. ते मला सांगायचे आपली नैसर्गिक युती भाजपसोबत आहे. आपण हे का करतोय. आपण यात दुरुस्ती करा. आपण हे बदलावे. पाच वेळा हा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत. परंतु आम्हाला यश मिळाले नाही. हे करत असताना जी अडीच वर्षे गेली त्यात मोठा अनुभव आला. आज सावरकरांवर बोलू शकत नाही. ज्या दाऊदने बॉम्बस्फोट केले त्यांच्याशी यांचे कनेक्शन. संभाजीनगर बाळासाहेबांनी केले. आम्ही कालही शिवसैनिक होतो. आजही शिवसैनिक आहोत. उद्याही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब, दिघे साहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत.

हे राज्य सर्व धर्मियांचे…

मुख्यमंत्री शिंदे म्हणालेकी, आम्ही हिंदुत्ववादी. मात्र, इतर धर्मियांना हे त्यांचे राज्य वाटेल असे काम आम्ही करणार आहे. भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंडा आणि आमचा देखील तोच मागे गेलेले लोक हिंदुत्ववादी पक्षात आलो आहोत. 50 आमदारांमधील एकही आमदार पडणार नाही. आम्ही दोघे मिळून 2024 मध्ये 200 च्यावर आमदार निवडून आणू असे म्हणत, काँग्रेससोबत आम्ही सत्ता स्थापन करणार नाही. ज्या दिवशी असे होईल, त्या दिवशी माझी दुकान बंद करेल असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, याची आठवणही त्यांनी सांगितली.

भाजप सत्तेसाठी हापलेला नाही…

शिंदे म्हणाले की, भाजप सत्तेसाठी हापापले्ली आहे असे अनेक लोक म्हणत होते. मात्र, भाजपचे 115 आमदार असताना 50 आमदारांच्या गटाला त्यांनी मुख्यमंत्री केले. यातून त्यांनी दाखवून दिले, की भाजपला सत्तेची गरज नाही, तर त्यांना हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात जात पुढील आमदार आपल्या पक्षाचा होईल असे सांगत होते. त्यांनी 100 उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, तसे टार्गेटच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमदार सैरभैर झाले होते. आम्ही 50 लोक दंबग नेते आहोत, स्वत:चे आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आहेत. मात्र, आम्ही रक्तपात होऊ देणार नाही, पण आमच्या सहनशिलतेचा अंत होऊ देउ नका, असा इशाराही त्यांनी दिला.

शहा पहाडासारखे उभे…

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, महाराष्ट्राच्या विकासासाठी कधीही काही कमी पडू देणार नाही. मोदींनाही सर्वांनी हिनवले. मात्र, त्यांना हिनवणारी पार्टी संपत चालली आहे. लोक मोदीविरोधात कुणी बोलले, तर जनता त्यांना संपवते. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. शिवाय शहा आपल्या पाठिमागे पहाडासारखे उभे असल्याचे सांगितले.

शिवसैनिकाला काय मिळाले…

शिंदे म्हणालेकी, आता सांगलीचा माणूस बघा. ते त्रस्त आहेतच. एका आमच्या माणसाला मोक्का लावला. तडिपारी केली. मारणारा माणूस वेगळा. पोलिसांना सांगितले. बाबा हा कार्यकर्ता निर्दोष आहे. उलट त्याला सांगितले असते, तो निर्दोष आहे. तर सुटला असता. मात्र, तसे केले नाही. तो माझ्याकडे येऊन ओक्साबोक्शी रडत होता. सत्तेतल्या शिवसैनिकाला काय मिळाले. काहीच नाही मिळाले. ते ही माझ्याकडे येऊन रडायचे.

राऊतांवर जोरदार टीका…

संजय राऊतांवर शिंदे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 40 रेडे पाठवले म्हणले. मात्र, आई कामाख्या देवी म्हणाली जो बोलला तो रेडा नको. आम्ही बंडखोर, गद्दार नाही. आमच्या रक्तात बंडखोरी नाही. कामाख्या देवीने आता कोणाचा बळी घेतला. मी म्हणालो दोन्ही खासदार निवडून येण्याचे गणित होते. सगळी फिल्डिंग लावली. राऊत साहेब आणि संजय पवार. दुसऱ्यावेळी दुसऱ्या दिवशी विधान परिषद निवडणूक होती. त्या आधी संजय पवारांना तीन मते मी बाहेरून आणली. कारण आम्ही वेगळे मार्किंग केले होते. त्यानंतर विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यायचे ठरवले. माझ्या ध्यानी मनी रक्तात येणार नाही. तर मी सांगितले दोन्ही निवडून आले पाहिजेत. आम्ही जाताना दोन्ही निवडून आले. मी कुठे चाललोय मला माहिती नाही. काही प्लॅनिंग नाही. बोलत बोलत निघालो. मात्र, विजयी झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो हे सांगायला ते विसरले नाहीत.