संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे फुलांच्या पायघड्या घालून स्नान, पालखी अकलूजकडे मार्गस्थ

0
19

संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आज निरा नदीच्या काठी निरास्नान करण्यात आले. तेथे आरती झाल्यानंतर पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या. यावेळी भाविकांनी ‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली, ग्यानबा तुकाराम’चा गजर केला.

कोरोना काळातील दोन वर्षाच्या खंडानंतर निघालेली संत तुकाराम महाराज पालखी पुणे जिल्ह्यातील सराटी गावात सोमवारी मुक्कामास होती. हा पालखीचा शेवटचा टप्पा आहे. मंगळवारी सकाळी निरा नदीच्या काठी पादुंकाचे स्नान झाल्यानंतर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी सराटी गावात गर्दी केली होती.

नदी काठावर फुलांचे आच्छादन

पादुका स्वागतासाठी नीरा नदी काठावर फुलांचे आच्छादन करण्यात आले होते. यासाठी गुलाब, झेंडू, मोगरा, गुलाबांच्या पाकळ्याचा वापर करण्यात आला. झेंडेकरी टाळकरीच्या गजरात माऊलींची पादुका निरा नदीच्या काठावर आणण्यात आले. तेथे स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखीत पादुका विराजमान झाल्या. पालखी सोहळा प्रमुखांनी सराटी गावकऱ्यांचे आभार मानले. मोरे महाराजांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर पोलिस अधिक्षक, सराटी गावचे सरपंच, कोळी बांधव यांचा समावेश होता. त्यानंतर पालखी अकलूजकडे मार्गस्थ झाले. सराटी हद्दीतून सोलापूर जिल्हयात पालखी मार्गस्थ झाली.

निरा काठी गर्दी

नीरा नदीच्या काठी सकाळपासून वारकरी व भक्तांची गर्दी होती. स्नानानंतर वारकरी तेथे भजन, अभंग म्हणत होते. यंदा निरा नदीत पाणी असल्याने वारकऱ्यांची सोय झाली.

पुणे पोलिस आनंदी

पुणे जिल्हयातून सोलापूर जिल्हयात पालखी प्रवेश केला त्यावेळी पुणे पोलिसही आनंदले. वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. यात आम्हाला भक्तीचा आस्वाद घेता आला, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या.

पादुकास्नानासाठी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
पादुकास्नानासाठी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
स्नानानंतर पादुका पुन्हा पालखीत विराजमान करण्यात आला.
स्नानानंतर पादुका पुन्हा पालखीत विराजमान करण्यात आला.

तुकोबारायांच्या दिंडीत काँग्रेसच्या पटोलेंकडून पांडुरंगाचा जयघोष

पांडुरंगाची आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीपर्वाचे चालते-बोलते रूप. इथे सगळे भेद गळून पडतात. या वारीत सहभागी होण्याचा आणि इथल्या भक्तीनादात दंगण्याचा मोह साऱ्यांनाच होतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मंगळवारी या वारीत सहभाग होत पांडरंगाच्या नामाचा जयघोष केला.

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या दिंडीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलाय. अकलूज येथे ही दिंडी आली असता, नाना पटोले या सोहळ्यात सहभागी झाले. पटोले वारकऱ्यांच्या वेशात आले. डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी. कपाळावर अष्टगंध आणि बुक्का. गळ्यात टाळ. वारकऱ्यांनी सुरू अभंग सुरू करताच पटोलेंची पावले यावेळी थिरकली. ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात त्यांनीही या भक्तिरसाचा आनंद लुटला