37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home महाराष्ट्र लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार – पालकमंत्री दीपक केसरकर

लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार – पालकमंत्री दीपक केसरकर

0
23

मुंबई, दि. १ : मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाचे उद्घाटन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते जी – नॉर्थ कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते. हे अभियान १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

blank

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई आर्थिक राजधानीचे शहर असल्याने देशभरातून लोक येथे येतात. यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महानगरपालिकेवर असून, ते ती पूर्ण करीत आहे. तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. याकामी शासनाचे सर्व विभाग सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे तसेच महानगरपालिकेच्या कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मितीवर भर

मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा, यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण करण्यात येणार आहेत. हे करीत असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

blank

आजारांचे मूळ अस्वच्छतेत असल्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी, असे आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केले. तर उपायुक्त श्री. बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती जाधव यांनी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत उपाययोजना केल्या जातील, याबाबत आश्वस्त केले. ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ‘मितवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

blank