Home महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभे करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभे करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0

सांगली दि.26 : कामगारांच्या व्यथा, अडचणी, त्यांची सुख:दुख: ही मी स्वत: भोगलेली असून यातून कामगारांच्यासाठी काही तरी मार्ग निघावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करून एकाच छताखाली कामगारांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे १७ व्या कामगार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर,  ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी,  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, कामगार कष्टाचे काम करत असतो त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. कामगारांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला मल्टीपर्पज ईएसआय हॉस्पीटलसाठी प्रयत्न करीत असून ६ ईएसआय हॉस्पीटल मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पुणे येथील मल्टीपर्पज हॉस्पीटलची पायाभरणी लवकरच करण्यात येईल.  कामगारांची मुले खेळ, उद्योगात आली पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी वास्तू उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ईएसआय हॉस्पीटलला जोडूनच कामगारांच्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कामगारांच्या मुलांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून प्रत्येक वर्षी कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. तारा भवाळकर यांनी साहित्य संमेलन अत्यंत आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देवून येथून पुढे प्रत्येक वर्षी साहित्य संमेलन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जुन्या व नव्या साहित्याचा इतिहास नोंदविला जावा असे सांगून डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, वर्षभर कवि संमेलन, कथाकथन, परिसंवाद अशा प्रकारचे कार्यक्रम विविध ठिकाणी घ्यावेत त्यामुळे त्या त्या ठिकाणच्या कलाकारांना वाव मिळेल. कामगार ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांना चांगली स्वच्छतागृहे, स्वच्छ पाणी, खाण्यापिण्याची व्यवस्था अशा सुविधा त्यांना परवडतील अशा पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले, कामगार साहित्य चळवळीची अत्यंत आवश्यकता आहे. अनुदवादक फळी निर्माण करून आपल्या भाषेतील साहित्य इतर ठिकाणी पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी वैचारिक लेखन, नाट्यलेखन, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील  विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी साहित्य संमेलनाबद्दल सविस्तर माहिती देवून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले. आभार सहायक कल्याण आयुक्त माधवी सुरवे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version