मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण

0
3

मुंबई दि 4:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले.

  विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टीव्ही मालिका, वेब सीरिज या विश्वातील गुणवंतांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. गुंतवणूक तज्ज्ञ रचना रानडे यांना युथ आयकाॅन पुरस्कार, स्वच्छतादूतांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील ‘स्वच्छ’ संस्थेस ‘वसुंधरा साथी’ पुरस्कार, संगीतकार अशोक पत्की यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मटा सन्मान’ सोहळा ही एक चांगली परंपरा आहे. अशा पुरस्कारांची समाजासाठी आवश्यकता आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र टाईम्स नेहमीच अग्रेसर असतो. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपत जनहिताचे कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. चित्रपट सृष्टीला अधिकाधिक पाठबळ देण्यासाठी सहकार्याच्या भावनेतून निर्णय घेण्यात येत आहेत. या क्षेत्राच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील. स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणारे स्वच्छतादूत तसेच संस्था यांना देखील सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

भारतरत्न लता मंगेशकर संगीत अकादमी, आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येत आहे. तसेच संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

जीवनात संगीताच्या गुंतवणुकीने मनं स्वच्छच होतात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मटा सन्मान’ सोहळा हा रसिक आणि कलाकारांना आपलासा वाटणारा सन्मान आहे. आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संगीतकार अशोक पत्की यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. अशोक पत्की यांच्या संगीताची जादू अनोखी आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना आजही निखळ आनंद  देत आहेत. माणसाच्या जीवनात जर संगीताची गुंतवणूक केली तर मन स्वच्छच होतं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.