आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
5

मुंबई, दि. 6 :- कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा शहरात मध्यवर्ती ठिकाणची अन्य जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांच्या उपस्थितीत उपकेंद्रासाठी जागेची पाहणी करावी. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जागा अंतिम करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील उपकेंद्रास जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकुलगुरू डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. एम. शिंदे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोल्हापूर येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा मिळाल्यास कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध आरोग्य अभ्यासक्रम सुरु करता येतील. आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. यातून वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होईल. या पार्श्वभूमीवर आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली तीन एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी. आवश्यक असलेल्या जागेची पाहणी वैद्यकीय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी संयुक्त करून जागा निश्चित करावी. ही जागा योग्य नसल्यास अन्य पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.