डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय-राज्यपाल रमेश बैस

0
9

मुंबई, दि. 14 : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. वाढती लोकसंख्या, सातत्याने कमी होत असलेले कृषिक्षेत्र व हवामानातील तीव्र बदल या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांना आगामी काळातील आव्हानांसाठी तयार राहावे लागेल तसेच वातावरण बदलांमुळे होणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३८ वा दीक्षान्त समारंभ झाला, त्यावेळी राजभवन येथून स्नातकांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

देशात कुशल मनुष्यबळ आहे व लोकांना पारंपरिक शेतीचे ज्ञान आहे. या क्षमतांचा वापर करुन कृषि स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनवावे व त्याहीपुढे जाऊन देशाला जगासाठी ‘अन्नधान्याचे कोठार’ बनवावे असे आवाहन त्यांनी केले.

मागील दहा वर्षात देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, त्यांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी, कृषि शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत असे सांगून राज्यात फलोत्पादन व फुलशेती उद्योगाला तसेच अन्नप्रक्रिया क्षेत्रात स्टार्टअप्स सुरु करण्यास बराच वाव असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर जल व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल तसेच मृदा गुणवत्ता सुधार व उत्तम बीजनिर्मिती याकडे देखील लक्ष द्यावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

वातावरणीय बदलाच्या संकटाचे कृषी पदवीधरांनी संधीत रूपांतर करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे

शेतीसमोर वातावरणातील बदलाचे प्रमुख संकट आहे. कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि संशोधनाद्वारे वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

कृषिमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे कृषी ज्ञानार्जनाचे पर्व संपले असले, तरी वास्तविक जीवनात ज्ञानार्जनासाठी त्यांची खरी परीक्षा सुरू होणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवले. कै स्वामीनाथन यांनी वेगवेगळ्या वाणांचे संशोधन करून देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवली व देशासमोरील अन्नधान्याचे संकट दूर केले. त्यांची प्रेरणा घेऊन काम केल्यास शेती क्षेत्रासाठी ते उपयुक्त ठरेल. राज्य शासनाने नुकताच गुगलबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात भागिदारीचा करार केला आहे. या कराराचा सर्वात मोठा लाभ कृषी क्षेत्राला होणार आहे. आगामी काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असल्यामुळे कृषी पदवीधरांनी त्यासंबंधीच्या ज्ञानाचे पंख लावल्यास ते निश्चितपणे मोठी भरारी घेऊ शकतील. आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे आणि कृषी क्षेत्राचे मोठे योगदान असणार आहे. कृषी विद्यापीठातील विद्यार्थी हे स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करतील, असाही विश्वास मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यापीठ परिसरात झालेल्या दीक्षांत समारंभाला गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. झेड पी पटेल, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, राज्यातील कृषि व माफसू विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठाचे माजी कुलगुरु, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राध्यापक तसेच स्नातक उपस्थित होते. यावेळी ४०४० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तर ७९ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली.