
तर बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटीलांची सभागृहात खडाजंगी
वाळू चोरी करणाऱ्यांना सरकार पाठिशी घालत असुन,सरकारकडून, मंत्रालयातून सुचना जातात की गुंडांवर कारवाई करू नका-बाळासाहेब थोरात
वाळू व्यवसायात राजकीय लोकांचेच हात-नाना पटोले
मुंबई:-महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत वाळू माफिया, वाळूचोरी यावर बोलत होते. त्यांनी यावेळी आपण थांबवू शकत नाहीत अशी थेट कबुली देत वाळू माफियांसमोर हात टेकल्याची परिस्थिती आहे.तसंच, आपण वाळू माफिया किंवा वाळू चोरी यावर काही बंधन घालण्यापेक्षा त्याला मोकळीक द्यावी असं सभागृहाला सुचवलं आहे. दरम्यान, वाळू माफियांबद्दल आपण काहीच करू शकत नाहीत अशी जाहीर कबूली स्वत: महसूलमंत्र्यांनीच दिल्याने सर्वचजण अवाक झाले आहेत.
काय यादी वाचावी का?
सभागृहातील सर्वच पक्षाच्या लोकांचे लागेबांधे आहेत अशी जाहीर कबूली देत वाळू चोरीतील चक्रच आहे ते त्यांनी स्पष्ट केलं. वाळू चोरीवर काही कारवाई करण्याची वेळ आली की अनेक जणांचे फोन येतात. त्यामध्ये ते आपले आहेत. आपल्या जवळचा आहे असं सांगितलं जातं त्यामुळे कारवाई होत नाही अशी थेट कबुलीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी दिली. तसंच, सर्वच राजकीय पक्ष वाळूच्या व्यवसायात आहेत त्यामुळे यावर जास्त बोलता येत नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी काय इथं यादी वाचून दाखवू का? असंही ते म्हणाले आहेत.
यशोमती ठाकुरांचा हल्लाबोल
यावर विरोधकही मोठे आक्रमक झाल्याचं दिसलं. काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी वाळू धोरण फसलं असून मंत्री महोदयांनी याबद्दल जाहीर कबुली दिली आहे असा थेट आरोप करत तुम्ही 600 रुपयात कशी वाळू देणार आहात हे एकदा स्पष्ट करा असा प्रश्नही उपस्थित केला. तसंच, जर ट्रक पकडला तर 2 लाख रुपये दंड होत असेल तर तो कशातून भरणार अस म्हणत यामध्ये मोठ्या प्रमाणत टोळ्या तयार झाल्या आहेत असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
थोरात विखे पाटील खडाजंगी रंगली
बाळासाहेब थोरातही मोठ्या प्रमाणात वाळू प्रकरणावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांना मारतात. त्यानंतरही वाळू चोरी करणाऱ्यांना पाठिशी घातलं जातं असा थेट आरोप थोरातांनी केला आहे. तसंच, सरकारकडून, मंत्रालयातून सुचना जातात की गुंडांवर कारवाई करू नका असा थेट घणाघात बाळासाहेबांनी केला आहे. तसंच, नवा प्रश्न उपस्थित केलाय.
ग्रामपंचायताला, नगर परिषदेला वाळू वितरणाची परवानगी द्यायची हे गंभीर आहे असं म्हणत हे धोरण आपण आणू शकतो का हे आपण सांगा असं बाळासाहेब थोरात म्हणताच विखे पाटील उत्तरासाठी उठले आणि त्यांनी थोरांतांवरच आरोप केले. उत्तरात विखे म्हणाले, थोरातांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांच्या काळातच या गुंडागर्दीच्या गोष्टी जास्त वाढल्या. तसंच, आम्ही यावर धोरण आणलं याचा त्यांना त्रास होतोय असा टालाही विखे पाटलांनी लगावला. त्यावर पुन्हा थोरात यांनी आपण हे आरोप आपण अजिबात मान्य करणार नाहीत असं म्हणत आरोप फेटाळून लावले. दरम्यान, एका जिल्ह्यातील हे दोन राजकारणी सभागृहातही एकमेकांविरूद्ध चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
नाना पटोले झाले आक्रमक
वाळू माफियांबद्दल विखे पाटलांनी उत्तर दिल्यानंतर विरोधक मोठे आक्रमक झाले. यावेळी वाळू व्यवसायात राजकीय लोकांचेच हात असल्याने त्यावर फार बोलता येत नाही अशी कबूली मंत्री विखे पाटलांनी दिली. त्यावर नाना पटोले हे आक्रमक झाले. त्यांनी आपण कोण लोक दबाव आणतात, कोण लोक फोन करतात, आणि कोण वाळू चोरी करत आहे याची नावं जाहीर करा अशी मागणी केली. तसंच, अशा गंभीर प्रकरणावर आपण कुणाचे नाव यामध्ये आहे ते जाहीर करावेत असंही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा व्यवसाय कोण आणि कसा चालवतं असं म्हणत जास्त बोलणं टाळलं आहे.