मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपचाच अन् एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम

0
171

मुंबई:-राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि पुन्हा एकदा राज्याच्या सत्तेच्या चाव्या महायुतीला मिळाल्या.महायुतीनं राज्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आता राज्यात महायुतीचंच सरकार आलं हे जवळपास निश्चितच झालं. पण, आता पुढचा प्रश्न सर्वांना पडलाय, तो म्हणजे, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? विधानसभेच्या घवघवीत यशानंतर आता महायुतीच्या गोटात मुख्यमंत्रीपदाबाबत कुजबुज सुरू झाली आहे. तर, नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 25 तारखेला होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करुन टाकण्यात आलं आहे. अशातच आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार अशी माहिती सुत्रांच्या वतीनं मिळत आहे.

राज्यात महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार, विश्वसनीय सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पदं कायम राहणार आहेत. पण, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचाच असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार, अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.

25 तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीनं 236 जागा जिंकल्या. विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती मिळतेय. 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच सरकार स्थापन केलं जाणार असल्याचं समजत आहे.