पुणे,दिनांक २३ एप्रिल :-घटनेचे शिल्पकार, बोधीसत्व, तर्कशास्त्रज्ञ, क्रांतीसूर्य, विश्वरत्न, युगपुरूष, कायदेपंडित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त सोलापूर येथे सी.एम.बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने नुकताच जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेल्या संविधानाच्या उंच देखाव्याने सोलापूरकरांचे लक्ष वेधले.’आपलं संविधान, आपला स्वाभिमान’ या विचाराने प्रेरित होवून संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
महामानव डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन तसेच संस्थेच्या वतीने साकारण्यात आलेल्या संविधानाच्या देखाव्याचे उदघाटन संस्थेचे आधारस्तंभ आणि बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी, युवा उद्योजक संग्रामसिंहभैय्या मुसळे साहेब, सांगोल्याचे उद्योजक उदयकुमार साहेब साळवे, शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेचे संस्थापक मनोज भैय्या सी.एम. चलवादी, उत्सव अध्यक्ष नरसिंग भाऊ चलवादी, उपाध्यक्ष राजूभाऊ कांबळे, सौरभ भाऊ शिंदे यांच्या सह मोठ्यासंख्येने भीमसागर उपस्थित होता.संस्थेच्या वतीने सर्व पाहुण्यांचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..
उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.हुलगेश चलवादी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहतील. बाबासाहेबांच्या समतेवर आधारित तत्त्वज्ञानामुळे शेकडो कुळांचा उद्धार झाला. त्यांचे विचार हे आमच्यासाठी अमृतासारखे आहेत. सामाजिक न्याय, बंधुता, समतेचे तत्त्व बहुजन समाज पक्ष सातत्याने पुढे नेत आहे. बाबासाहेबांची त्रिसूत्री – ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ – हे तत्व आजही बसपाच्या समाज परिवर्तनाच्या लढ्यात मार्गदर्शक ठरत आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून मान्यवर कांशीरामजी आणि सुश्री मायावतीजी यांनी बहुजन समाजाला सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोहोचवले. आता हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.देशातील कोट्यवधी दलित, आदिवासी, ओबीसी तसेच इतर उपेक्षित घटकांनी बहुजन समाज पक्षासोबत येत आंबेडकरवादी विचार स्विकारावेत, असे आवाहन डॉ.चलवादी यांनी केले.संविधानवादी विचारसरणीमुळे व्यापक लोकहित व देशहित साध्य होऊ शकते आणि जातीयतेच्या जोखडातून मुक्त होऊन समतेवर आधारित भारत घडवता येईल, असे आवाहन डॉ. चलवादी म्हणाले.