मुंबई, दि. 07 मे 2025: महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. 7) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या 28 वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
नवनियुक्त संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार मूळचे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर श्री. तालेवार 1997 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर येथे रूजू झाले. पदोन्नतीने सहायक अभियंता म्हणून कार्यरत असताना सन 2006 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. दरम्यान महावितरणकडून त्यांची गूडगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील (एमडीआय) एनर्जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. सन 2007-08 मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
त्यानंतर सन 2016 मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीमध्ये श्री. सचिन तालेवार यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर लातूर येथे काम केले. तर सन 2018 मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी जून 2018 ते डिसेंबर 2022 पर्यंत काम केले. बदलीद्वारे छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना मे 2023 मध्ये श्री. तालेवार यांची इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून निवड झाली. या कंपनीत ते दोन वर्षांपासून कार्यरत होते. त्यानंतर महावितरणचे संचालक (प्रकल्प) म्हणून नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली आहे.
‘महावितरणच्या ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेसह (आरडीएसएस) विविध योजनांमधून पायाभूत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांसोबतच प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सर्व योजनांना आणखी गती देत कामे लवकर पूर्ण करण्यात येईल’, असे महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी सांगितले.