राज्यातील प्राध्यापकासह कर्मचार्यांचे वेतन रखडले

0
5

गोंदिया,दि.8 : राज्यातील उच्चशिक्षण विभागांतर्गत येणारी अनुदानित महाविद्यालये, अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठातील हजारो प्राध्यापक व कर्मचायांचे पगार गेल्या महिनाभरापासून थकल्याने यांच्यावर आर्थिक संकट आेढवले आहे. एचटीई सेवार्थ वेतन प्रणालीत पगारपत्रकेच अपलोड झालेली नाहीत. यामुळे महिन्याच्या एक किंवा दोन तारखेला होणारे पगार आता महिन्याच्या शेवटी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पगार करण्यासंदर्भात सेवा घेतलेल्या कंपनीचे कंत्राट संपल्यामुळे त्यांनी वेबसाइट बंद केल्यामुळे हा गुंता निर्माण झाला आहे.
राज्य सरकार बहुतांश विभागातील कर्मचारी, अधिकाºयांचे पगार एचटीई सेवार्थ वेतन प्रणालीद्वारे करते. यात उच्चशिक्षण विभागाशी संबंधित अनुदानित महाविद्यालये, अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठातील यांचाही समावेश आहे. ही महाविद्यालये, विद्यापीठे संबंधित उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयांकडे चालू महिन्यातील २० तारखेपासूनच पगारपत्रके दाखल करतात. सहसंचालक कार्यालय ही पगारपत्रके तात्काळ मंजूर करून कोषागाराकडे (ट्रेझरी) अनुदानासाठी पाठवतात. कोषागाराने अनुदान मंजूर करताच उच्चशिक्षण विभाग संबंधित महाविद्यालये, विद्यापीठाच्या बँक खात्यात आरटीजीएस करतात. ही सर्व प्रक्रिया महिना संपताच एक किंवा दोन तारखेलाच पूर्ण होते. मात्र, पगारपत्रके अपलोड करण्यासाठीची सेवार्थ वेतन प्रणालीच अपडेट नाही. मागील महिन्याच्या २० तारखेपासून राज्यातील एका अनुदानित संस्थेतील पगारपत्रके अपलोडच झालेली नाहीत.