सर्व विरोधक एकत्र आले तरच भाजपला रोखणं शक्य :जिग्नेश मेवानी

0
12

औरंगाबाद,दि.30(विशेष प्रतिनिधी).  ‘देशात मोदी नावाचा आजार पसरला आहे. देशातील चौकाचौकात, प्रत्येक रस्त्यावर मोदी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. इतक्या मोठया प्रमाणात भाजपकडे पैसा आला कुठून, भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षही प्रबळ नाही, अशा स्थितीमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र आले तरच भाजपला रोखणे शक्य आहे,’ असे प्रतिपादन दलित अधिकार मंचचे अध्यक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले.  मेवानी संविधान यात्रेनिमित्त बुधवारी शहरात आले असता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर निवृत्ती सांगवे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, रमेश गायकवाड, अशोक पगार, प्रमोद मगरे, प्रदीप पगारे यांची उपस्थिती होती. यावेळी मेवानी म्हणाले, ‘देशामध्ये विरोधी पक्ष प्रबळ नाही. मात्र, आपण सर्वांनी मिळून भाजपला रोखण्यासाठी एकत्र आले पाहिजे. यासाठी सर्वांना व्यक्तिगत स्वार्थ सोडावा लागेल. आपल्याला राजकीय धोरण ठरवावे लागणार असून, यासाठी दबाव वाढवण्याची गरज आहे. आज देशामध्ये मनूवाद आणि भांडवलशाहीच्या एकत्रिकरणाला आपण समजून घेतले पाहिजे. समाजाच्या एका वर्गाकडे लाखो एकर जमीन, पैसा आहे तर दुसरीकडे शेतमजुरी आणि कारखाण्यात काम करणारा कामगारवर्ग आहे. आपली ही लढाई आत्मसन्मान आण संसाधनांसाठीची आहे. देशातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक दलित वर्ग हा झोपडपट्टीत राहून शेजमजुरी आणि कारखान्यात राबत आहे. दलित आंदोलन हे मजुरांचे आंदोलन आहे. यासाठी दलित पँथर सारखा निस्वार्थी लढा द्यावा लागेल. दलित आंदोलनापुढे आता केवळ अॅट्रॉसिटी आणि खैरलांजी हे विषय नको. आंदोलनाचा दृष्टीकोन व्यापक होण्याची गरज असून त्यासाठी मराठवाड्याचे पाणी, शेतकरी आत्महत्या आदींबाबतही आपण काम केले पाहिजे,’ असे आवाहनही मेवानी यांनी केले.

जाती, धर्माच्या नावावर छळ

प्रल्हाद लुलेकर म्हणाले, ‘देशात जाती-धर्माच्या नावावर लोकांना छळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मराठवाड्यात दुष्काळ आहे आणि मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढत आहेत. निवडणुकीत बहुमत मिळाले म्हणजे सरकारला मनासारखे निर्णय घेता येत नाही, अल्पमतात आलेल्यांनाही विचारात घ्यावा लागेल. मात्र, आज देशामध्ये असे होताना दिसत नाही. सरकारने संविधानाची छेडछाड करू नये, देशात राज्यघटना, पोलिस, न्यायव्यवस्था कायम आहे. देशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.’ दरम्यान, यावेळी कडूबाई खरात यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.