39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home महाराष्ट्र संमेलनाला दीड लाख साहित्यप्रेमी येण्याचा अंदाज,मंडप उभारणीला सुरवात

संमेलनाला दीड लाख साहित्यप्रेमी येण्याचा अंदाज,मंडप उभारणीला सुरवात

0
25

उस्मानाबाद,दि.27 : १०, ११ व १२ जानेवारी २०२० दरम्यान होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या (मल्टी पर्पज) शाळेच्या पाठीमागील भागात मोकळ्या मैदानावर सुमारे १० हजार रसिक-साहित्यिक बसतील इतक्या आकाराचा भव्य मुख्य मंडप उभारण्यात येत आहे. याच शाळेच्या प्रांगणात मंडप क्रमांक दोन आणि ग्रंथ दालन उभारत आहे. तर शाळेच्या आतील प्रांगणात मंडप क्रमांक ३ ची रचना करण्यात येत आहे. संमेलनासाठी सुमारे दीड लाख रसिक-साहित्यिक उपस्थित राहतील, असा अंदाज असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी  सांगितले.blank

उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘पोत’ या वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकाची स्मरणिका वेगळेपण जपणारी ठरणार आहे. उस्मानाबादचा शतकांचा इतिहास, प्राचीन वारसा, परंपरा, बोली, सांस्कृतिक संदर्भ आणि हे सारे सामावून घेणारे आजचे वास्तव, यांची गुंफण करत स्मरणिकेचा हा ‘पोत’ उजळणार आहे.साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणारी स्मरणिका नेहमीच संग्राह्य स्वरूपाची असावी, असा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आयोजक मंडळी नेटाने प्रयत्न करतात. उस्मानाबादकरही याला अपवाद नाहीत. त्यामुळे शीर्षकापासूनच त्यांनी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. ‘पोत’ ही संज्ञा अनेक अर्थांची वलये प्रकट करणारी आहे. ‘पोत’ हे महाराष्ट्राची कुलदेवता असणाऱ्या देवी तुळजाभवानीच्या जागरणाच्या निमित्ताने उजळली जाते आणि नाचवली जाते. प्रमाण भाषेतील ‘पोत’ संज्ञा दर्जा आणि स्पर्श संवेदनेशीही जोडली गेली आहे.

उस्मानाबादच्या इतिहासात प्रथमच अखिल भारतीय पातळीवरील साहित्य संमेलन होत आहे. संमेलन आयोजकांनीही संमेलन अत्यंत दिमाखदारपणे साजरे करण्याची भूमिका घेतली असून, त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात आणि पाठीमागील सरकारी जागेत संमेलनाचा उत्सव पार पडणार आहे. शाळेच्या मागील जागेत सुमारे १० हजार रसिक-साहित्यिकांच्या क्षमतेचा मंडप उभारण्यात येत आहे. मंडप उभारणीचे काम सोलापूर येथील कंपनीकडून करण्यात येत आहे. कन्या शाळेच्या प्रांगणात सुमारे २५० स्टॉल्सचे ग्रंथदालन उभारण्यात येणार आहे. ग्रंथदालनाचेही काम सुरू झाले आहे. क्रमांक दोन मंडपही याच प्रांगणात असून, तिथे ५०० ते ७०० रसिक-साहित्यिकांच्या क्षमतेचा मंडप असेल. या मंडपामध्ये परिसंवाद होतील. शाळेच्या अातील प्रांगणात कवीकट्ट्याचा मंडप उभारण्यात येत आहे.

बोलीभाषांना प्रथमच महत्त्वाचे स्थान

पोत ही स्मरणिका वाचकांच्या स्मरणात राहील, अशा पद्धतीने तयार केली आहे. बोलीभाषांना प्रथमच इतके महत्त्वाचे स्थान दिले गेले असावे. त्यासोबत ‘पोत’मधून अनेक वेगळे विषय मांडण्यात आले आहेत. उस्मानाबादसारख्या छोट्या गावांतूनही साहित्य संमेलनासारखी प्रचंड ‘इव्हेंट’ साधेपणाने तरीही देखणेपणाने साकारता येते, याची झलक ‘पोत’मधून मिळेल. – रवींद्र केसकर, कार्यवाह, उस्मानाबाद साहित्य संमेलन.