मुंबई,दि.22ः-राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील, झाडांची कत्तल केल्यानंतर हा वाद टोकाला पोहाचला आहे. मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तसंच ही चर्चा काही दिवसांपासून चालू होती. मात्र भिडे यांची बदली करण्यात आली असून, ही जबाबदारी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.राज्य प्रशासनात फेरबदल केल्यानंतर, कडक शिस्तचे समजले जाणारे तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.दरम्यान, ठाकरे सरकारने प्रशासनात फेरबदल करून यापूर्वी 23 सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या होत्या. तरीसुद्धा या आठवड्यातील मंगळवारी 20 सनदी अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नागपूर मनपा भाजपच्या ताब्यात आहे. राजकीय दबाव झुगारून धडाडीचे निर्णय घेणारे अधिकारी म्हणून मुंढे यांची ख्याती आहे. त्यामुळेच भाजपला अडचणीत आणण्यासाठी मुंढे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, मेट्रो प्रकल्पांतर्गत कारशेडसाठी आरे परिसरात रातोरात वृक्षतोड करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अश्विनी भिडे यांच्या उचलबांगडीमागे शिवसेनेची नाराजी हेच कारण सांगितले जात आहे.
इतर बदल्या पुढीलप्रमाणे…
एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची अतिरिक्त मुख्य सचिव जलसंधारण विभाग, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आता महाराष्ट्र राज्य वीज पारेषण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक, तर याठिकाणी असलेले पराग जैन नानोटिया यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त राजीव जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालय सचिव, उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा लवंगारे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी तर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची पुणे मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
अनिल कवडे सहकार आयुक्त
मुद्रांक शुल्क नोंदणी नियंत्रक व महानिरीक्षक अनिल कवडे यांची सहकार आयुक्त, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव यांना साखर आयुक्त, पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त एस. एस. डुंबरे यांची महासंचालक मेढा, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांची महानिरीक्षक व नियंत्रक मुद्रांक शुल्क विभाग, संपदा मेहता यांना सहआयुक्त विक्रीकर विभाग मुंबई, मुख्य सचिव यांचे सचिव राजीव निवतकर यांना मुंबई शहर जिल्हाधिकारी, मुख्य सचिव यांचे सचिव म्हणून नव्याने सनदी अधिकारी झालेले मंत्रालयातील उपसचिव किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोला जि.प.सीईओपदी जाधव
अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष्य प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषद सीईओ, तर या ठिकाणी असलेले सीईओ यू. ए. जाधव यांची अकोला जिल्हा परिषद सीईओपदी नियुक्ती केली आहे.




