पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच; सदस्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक

0
761

मुंबई,दि.25 – गणेशोत्सवानंतर 7 सप्टेंबरपासून अधिवेशन घेण्यात यावे, असा प्रस्ताव आज झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांनी अधिवेशन 2 दिवसांचे असावे, असा प्रस्ताव मांडला. यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन किमान 4 दिवसांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अखेर 2 दिवसांच्या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली.

विधानसभा अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबर 2020 या काळात होणार आहे. यासाठी प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील फिजिकल डिस्टन्सिंग राखून सदस्यांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अधिवेशनाअगोदर म्हणजे 6 तारखेला सर्व सदस्यांची अँटिजेन चाचणी केली जाईल. यानंतर प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट देण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, सदस्यांच्या पीएना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही, मात्र त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

वाहन चालकांना देखील बसण्याची तसेच त्यांच्या नाश्ता, चहापाणी स्वतंत्र व्यवस्था या अधिवेशनादरम्यान करण्यात येणार आहे. इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयके यावर विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा होईल.फिजिकल डिस्टन्सिंग पालन करावे लागणार असल्याने काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसण्याचा प्रस्ताव आहे. अधिवेशनामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक सदस्यांना आदल्या दिवशी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. जे सदस्य निगेटिव्ह असतील त्यांनांच सभागृहात प्रवेश दिला जाईल. विधिमंडळाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी देखील कोरोनाची चाचणी घ्यायची की नाही ते चर्चेत ठरवलं जाईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केलं.