लातूर, दि. 20 : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे जाऊन जिल्ह्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी तसेच कोविड-१९ संदर्भाने आढावा घेतला. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, त्याचबरोबर कोविड-१९ च्या संदर्भाने उपचार आणि जनजागृती करताना दुर्लक्ष होऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, धीरज पाटील, श्री. शेरखाने, विश्वास शिंदे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या एकूण नुकसानीची माहिती घेतल्यानंतर अमित देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणेने शेती तसेच शेतामधील पिके अवजारे व इतर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे, विमा कंपन्यांशी संपर्क करावा आणि सर्व अहवाल तातडीने शासनाला सादर करावे, असे स्पष्ट निर्देश दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असून त्यांना आधार देणे ही शासनाची प्राथमिकता आहे असेही त्यांनी सांगितले. बैठकी दरम्यान अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला. कोविंड रुग्ण संख्येचा आलेख खाली येत असला तरी यासंदर्भातील उपचार आणि जनजागृतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा दुर्लक्ष होऊ नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कोविड-१९ रुग्णांवरील उपचारासाठी उस्मानाबादमध्ये अधिक डॉक्टर्सची गरज असल्याचे निदर्शनास आले असल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागाने या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
उस्मानाबाद येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य जागा निवडून तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली.