34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home मराठवाडा/खान्देश औरंगाबाद जिल्ह्यातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची...

औरंगाबाद जिल्ह्यातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

0
43

blank

औरंगाबाद, दि. २७ : औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील आणि शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. उद्योग व शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा होण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व महावितरणच्या सहसंचालकांनी संयुक्तपणे उपाययोजना करून कार्यअहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिल्या.

औरंगाबाद जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नांवर पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील कृषीपंपाना अनियमित वीजपुरवठा, अनेक ठिकाणी रोहित्रे नादुरूस्त तसेच रोहित्रांसाठी ऑईलची कमतरता आदी समस्या यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी मांडल्या. औरंगाबाद शहरातील 33 केव्ही उपकेंद्रांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी पडेगाव येथे 220 के.व्ही.वाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली. कन्नड विभागाचे विभाजन करून सिल्लोड विभागाची निर्मिती करणे आदी मागण्या यावेळी लोकप्रतिनिधींनी मांडल्या.

यावर डॉ. राऊत यांनी, जिल्हाधिकारी आणि ऊर्जा विभागाने शहराची भविष्यातील उद्योग, नागरी व शेतीसाठीच्या विजेची गरज लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंजुरी देण्यात येईल, असेही सांगितले. लवकरच कृषीपंप वीजजोडणी धोरणासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे शेतकऱ्यांचे विजेच्या अनुषंगाने असलेले प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रब्बी हंगामात अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी आधीच घोषणा केली असून त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. रब्बी हंगामानंतर ऊर्जा विभागाची विजेची थकबाकी मिळाल्यास ऊर्जा विभागाला अधिक बळ मिळेल. जेणेकरून त्या-त्या भागात ऊर्जा क्षेत्राशी निगडित कामे करता येतील, असेही डॉ. राऊत म्हणाले.

रोहित्रांना लागणारे ऑईल स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच अनेक उपकेंद्रांवरील विजेचा दाब कमी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या सर्व प्रश्नांवर जिल्हाधिकारी तसेच महावितरणच्या सहसंचालकांनी एकत्रित उपाययोजना करणारा अहवाल सादर करण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या.जिल्ह्यातील विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला जाईल तसेच शेतकरी व उद्योजकांना दिलासा देण्याची ग्वाही यावेळी उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

खासदार भागवत कराड, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, प्रशांत बंब, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, अतुल सावे यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महावितरणचे सहसंचालक नरेश गिते, कार्यकारी अभियंता श्री. खंदारे आदी उपस्थित होते.

blank