जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

0
95
परभणी, दि.३1 :- जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पूल व रस्ते हे खचलेले असून या कामासाठी तात्काळ ५६ कोटी रुपयांना मंजुरी देत आहे. आता पाऊस पूर्णपणे थांबलेला असून  सर्व कामांना गती देऊन रस्ता वाहतुकीसाठी चांगला व्हावा. याअनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे तातडीने  पूर्ण करावीत,  असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी ते बोलत होते . या बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, अतिवृष्टीने रस्त्याचे व पुलाचे नुकसान झालेले आहे . त्याच्या कामाकरिता 56 कोटी रुपयांना मंजुरी देत असून निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात करा. तसेच कामांना गती द्या, अशा सुचना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना  देऊन वर्षभरापूर्वीच काम पूर्ण झालेल्या रस्त्यावर खड्डे पडण्याचे निदर्शनास येत असून  निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अहवाल पाठवावा. तसेच संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी संबंधित अधीक्षक अभियंता श्री. धोंडगे यांना दिले.
बैठकीच्या सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परभणी जिल्ह्यातील मंजूर कामे, लहान-मोठे पुलांची बांधकाम स्थिती, खड्डेमय रस्ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक खर्च, रस्ते विकासासाठी आवश्यक निधी, नाबार्ड अंतर्गत पूर्ण झालेली कामे, इमारत दुरुस्तीची कामे, कोविड-19  अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली विविध कामे याबाबतची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व इतर विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.