औरंगाबाद, दि.2 :- जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 94.59 टक्के एवढा झालेला असून संसर्गाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सतर्कतेने उपाययोजना राबवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसमवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतंर्गत सर्वेक्षणातून प्राप्त माहितीच्या आधारे कोमॉर्बिड लक्षणे असलेल्यांवर प्रामुख्याने यंत्रणा लक्ष देत आहे. अशा आजारांची लक्षणे, पार्श्वभूमी असलेल्यांच्या तब्येतीवर देखरेख ठेवण्यासाठी गृहभेटी देणे तसेच अशा लोकांसाठी तपासणी शिबीर, आरोग्य मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन मनपातर्फे करण्यात येणार आहे. तसेच आरटीपीसीआर चाचण्यांही जिल्ह्यात सुरु असून रुग्णांचे वेळेत निदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात खाटांची व इतर अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता ठेवण्यावर प्रामुख्यान भर देण्यात येत आहे. तसेच जनजागृतीद्वारे लोकांना मास्क वापरणे आणि अंतराचे पालन करणे यासाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनीधीनीही आवाहन करावे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
तसेच जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून सध्या एकूण 4156 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून घाटीत 931, मनपाकडे 235 आणि जिल्हा रुग्णालयात 2990 इंजेक्शन उपलब्ध असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून 94.59 टक्के आहे तर मृत्यूदर 2.68 टक्के वर आला आहे.जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या 1075057 तर ॲण्टीजन चाचण्या 286638 या प्रमाणे एकूण चाचण्या 394145 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 115 ठिकाणी 11763 आयसोलेशन बेड तर 2124 ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 532 आयसीयु बेड तर 290 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, होम आयसोलेशनद्वारे 2222 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण यांनी यावेळी दिली.
खा. श्री. कराड यांनी जगभरात कोरोना आजाराची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शहरी, ग्रामीण दोन्ही ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपचार सुविधा तयार ठेवण्याचे सूचित केले. आ. श्री. सावे यांनी जनजागृती, चाचण्यांचे प्रमाण आणि उपचार सुविधांसह यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे असून मनपा आणि पोलीस प्रशासनाने लोकांनी मास्क वापर आणि अंतराचे पालन करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरु ठेवावी, असे सूचित केले. आ. श्री. दानवे यांनी इतर देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे, त्यादृष्टीने आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढीव प्रमाणात तयार ठेवण्याबाबत सूचित केले.