39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home मराठवाडा/खान्देश धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!

धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!

0
80

नांदेड– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ‘हल्ला बोल’ मिरवणूकीला परवानगी नाकारली होती. मात्र शीख बांधवांतील काही तरुणांनी मिरवणुकीची तयारी केली होती. तेव्हा संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नांदेड पोलीस आणि तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती. यानंतर काही काळ याठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालं होतं.

जमावाच्या हल्ल्यात या परिसरात उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही हल्लेखोरांनी पोलीसांशी हुज्जत घालून बॅरिकेट तोडले आहेत. रस्त्यावर घटनेचं शूटिंग करणाऱ्या अनेक नागराकांचे मोबाईल या वेळी फोडण्यात आले होते. पोलीस उपअधिक्षक यांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. या घटनेत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर 30 ते 40 मोबाईल जमावातील तरूणांनी फोडले आहे.

हा सगळा उपद्रव सुरु असताना हल्लेखोरांनी थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. मात्र पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर झेलला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना काल रात्री रूग्णालयात दाखल करून तात्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, हल्लेखोरांनी पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, टायरमधील हवा काढून टाकली तर वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. यामुळे सदर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत 400 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.