अशोकरावांचे अचूक टायमिंग; “काही पे निगाहे कही पे निशाना”

0
37

चव्हाण परिवाराच्या तिसऱ्या पर्वाची विजयी नांदी,श्रीजया सुस्वागतम..!

नांदेड/ नरेश तुप्तेवार
आपल्या नियोजनबद्ध भव्य-दिव्य आयोजनासह अशोकरावांनी अचूक टायमिंग साधत, चव्हाण परिवाराच्या तिसऱ्या पर्वाची नांदी म्हणून श्रीजया यांचे पदार्पण पाऊल ठेवून,’एक पे एक फ्री’ चा धमाका उडवून देत सर्वांना सुखद धक्का दिला.

एकीकडे खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचे नांदेडमध्ये अभूतपूर्व असे नियोजन आणि आयोजन करतानाच, दुसरीकडे “कही पे निगाहे- कही पे निशाना” या उक्तीचा प्रत्यय देत, चव्हाण परिवाराच्या तिसऱ्या पर्वासाठी पीच तयार केले. श्रीजया नावाच्या खेळाडूची एन्ट्री आणि विजय निश्चित करत,सर्व मान्यतेचे शिक्कामोर्तब करून घेतले.

अशोकराव चव्हाणांना दोन मुली आहेत.त्यात श्रीजया यांना राजकारणात विशेष रस आहे. त्यांचे मुंबईत ‘एल.एल.एम.’पर्यंत शिक्षण झाले आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा वडिलांच्या सभांना हजेरी लावली. विशेषतः 2019 मधल्या लोकसभा निवडणुकीत श्रीजया यांनी अशोकरावांचा जोरदार प्रचार केला. विधानसभा निवडणुकीसाठीही श्रीजया यांनी अशोकरावांच्या प्रचारासाठी पुन्हा कंबर कसली. प्रचारात लक्ष घालत जनसंपर्कापासून साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री 9 वाजता देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीसह राहुल गांधींच्या या यात्रेचे महाराष्ट्रात अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले. या यात्रेत काँग्रेसचे महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेते हजर होते. यावेळी चर्चेचा विषय ठरला, तो म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुपुत्री श्रीजया चव्हाण! सक्रीय राजकारणापासून अद्याप लांब राहिलेल्या श्रीजया चव्हाणांचे भारत जोडो यात्रेत पोस्टर्स आधीच झळकले होते. त्यामुळे आता श्रीजया चव्हाण या राजकारणात एन्ट्री करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया व सुजया या देखील राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी देगलूर आणि यात्रेच्या मार्गावर लावण्यात आलेल्या होर्डिंगजवर देखील श्रीजया यांचे फोटो लागले आहेत. त्यामुळे भारत जोडोच्या निमित्ताने श्रीजया यांची राजकारणात एन्ट्री होत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज एका पाखराच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनेचा संदर्भ देत, त्यांच्या राजकीय वारसदाराची जणू घोषणाच केली आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे धाकटी कन्या श्रीजया, त्यांचा लोकसेवेचा वारसा पुढे चालवेल, हे आता स्पष्ट झाले आहे.
आपल्या ट्विटमध्ये चव्हाण म्हणतात, “पिल्लांच्या पंखात जेव्हा बळ येतं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, आणि आभाळात झेप घेण्यासाठी जेव्हा ती सज्ज होऊ लागतात, तेव्हा पाखरांना होणारा आनंद अवर्णनीय असाच रहात असणार.” या ट्विटमधील पाखराच्या पिल्लाने आभाळात झेप घेण्याचा संदर्भ श्रीजयाच्या राजकीय प्रवेशाची घोषणा असल्याचे स्पष्ट झाले.

एका चाणाक्ष पित्याने, धुरंदर नेत्याचे कसब पणाला लावून वेळेचा अचूक वेध घेत, गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या राजकीय नेत्यांची मान्यता मिळवून घेतली हे मात्र खरे!