औरंगाबाद- मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे साहित्य संमेलन १० व ११ डिसेंबरला संत रामदास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय घनसावंगी येथे पार पडणार आहे. हे संमेलन साहित्यिक डॉ.शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली साजरे हाेईल. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चौथे हे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन तर शेषराव मोहिते संमेलनाध्यक्ष मावळते संमेलनाध्यक्ष साहित्यिक बाबू बिरादार यांच्यासह साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. शनिवारी १० डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संमेलनाध्यक्ष शेषराव मोहिते, साहित्यिक डॉ. बाबू बिरादार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या उपस्थित संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
११ डिसेंबरला दुपारच्या सत्रात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलन अध्यक्ष श्रीकांत देशमुख हे मराठवाड्यातील राजकीय चित्र -दशा आणि दिशा यावर भाष्य करणार आहेत. समारोप सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, असे चौथे म्हणाले.