‘मिशन संवेदना’ उपक्रमांतर्गत दिव्यांग व्यक्तिंना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार – बच्चू कडू

0
1
वाढदिवसाच्या शुभेच्छा

धुळे : दिनांक 7 सप्टेंब;  ‘मिशन संवेदना’ उपक्रमांतर्गत दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशिय सभागृहात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता,  महापालिका आयुक्त सुनिता दगडे-पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य मार्गदर्शक श्री. कडू म्हणाले, ‘मिशन संवेदना’उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाभरातील प्रत्येक गावातील दिव्यांगांचे येत्या तीन महिन्यात सर्वेक्षण होणार आहे. दिव्यांगांचे हे सर्वेक्षण चांगल्याप्रकारे होईल याची दक्षता घ्यावी. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तिंना 11 प्रकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. दिव्यांगांना शारीरिक मर्यादा असूनही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. त्यांना साथ दिल्यास ते भव्यदिव्य यश संपादन करू शकतील यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दिव्यांग बांधवांसाठी 82 शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून दिव्यांगांसाठी 5 टक्के निधी खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.  दिव्यांगांच्या हितासाठी निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे जगातील व देशांतील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात राज्य शासनाने स्थापन सुरू करण्याचा घेतलेला निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जावून दिव्यांगाचे प्रश्न जाणून घेत असून येत्या काळात दिव्यांगासाठी घरकुल योजना राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित येण्याची गरज असून दिव्यांगांच्या तक्रारी दूर होण्यासाठी महिन्यातून केवळ एक दिवस दिव्यांग बांधवांसाठी दिल्यास त्यांच्या समस्या दूर करता येतील यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, जिल्हास्तरावरील शासनाच्या सर्व विभागाच्या शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेऊन त्यांना त्याचठिकाणी जलदगतीने लाभ देण्यासाठी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांत 5 हजार 300 लाभार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात येणार असून येथे येणाऱ्या दिव्यांगांचे विविध योजनेचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. दिव्यांगांचा सर्वागीण विकास होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आजपासून मिशन संवेदना हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून नाविण्यपूर्ण दहा सुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतुन ‘मिशन संवेदना’ हा नाविन्यपुर्ण दहा सुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी आशा वर्कर मार्फत जिल्ह्यात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार असुन पात्र दिव्यांगांना युडीआयडी (वैश्विक ओळखपत्र) वितरित केले जाणार असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी तसेच माजी सभापती अरविंद जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मिशन संवेदना उपक्रमाचे तसेच दिव्यांग लोगोचे अनावरण करण्यात आले.

प्रारंभी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांना विविध विभागांचे लाभ्ं देण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सला भेट देऊन माहिती घेतली. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश देवपूरकर, वाहिद अली यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्यने जिल्हाभरातील दिव्यांग बांधव व त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांना झाले लाभाचे वितरण

आमदार श्री. कडू तसेच मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, धुळेमार्फत महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानातंर्गत गोविंदा माधवराव पाटील यांना खेळते भांडवलाचा धनादेश वितरण, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत योगेश पाटील यांना घरकुलाच्या दुसऱ्या हप्ताचे वितरण, श्रीमती रत्नाबाई भासले, दशरथ राठोड यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रमाणपत्र, प्रमोद महाले, श्रीमती मंदाकिनी गायकवाड यांना ई -शिधापत्रिका, श्रीमती गंगुबाई गिरासे यांना प्राधान्य कुटूंब योजनेतंर्गत धान्य वाटप, गणेश बडगुजर, संतोष मोरे यांना स्वंयरोजगारासाठी बीज भांडवलाचा धनादेश वाटप, दिव्यांग प्रोत्साहन योजनेतंर्गत विजय बागुल यांना संसारोपयोगी साहित्य वाटप, पंढरीनाथ सोनवणे यांना वृद्ध कलावंत मानधन योजनेचे प्रमाणपत्र वाटप, रायफल शुटींग मध्ये राष्ट्रीय खेळाडू दर्शना गवते, राहुल बैसाणे यांना  स्मृतीचिन्ह वाटप, साई गिरवरलकर, हर्ष जाधव यांना शालांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत धनादेश वाटप, सुरेश अमृतकर, प्रतिभा पाठक, मंगलसिंग पवार, दिपक पहाडे, सिमरण शेख यांना युडीआयडी प्रमाणपत्र वाटप,रतिलाल चौरे यांना शबरी विकास योजनेतंर्गत घरकुल वाटप, संजय पाटील यांना गुराचा गोठा वितरण आदेश, रोजश नेरकर यांना कल्याणकारी योजना धनादेश वाटप, निल पाटील यांना एमआयसी थेरपी साहित्य वाटप, सुरेखा चौधरी, कैलास पाटील, शामली रोकडे यांना दिव्यांग सहायक योजनेतून वैयक्तिक लाभाचे वितरण, धुळे महापालिकेतील नितीन पाटील, सचिन चौधरी यांना दुचाकीचे वाटप, हिलाल माळी यांना दिव्यांग 5 टक्के लाभ, चंद्रमुनी शिंदे, सिध्दार्थ शिंदे यांना दुधाळ गायी म्हशीचे आदेश वाटप, हर्षाली महाले, शामली रोकडे यांना मतदान ओळखपत्र वाटप, हिरामण थोरात, बबलु ढोमले यांना नियुक्ती पत्र वाटप, तसेच झिपा केंदार यांना डॉ. बाबासाहेब कृषि स्वालंबन योजनेतंर्गत नवीन विहीर खोदकाम लाभाचा धनादेश प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आला.